पुणे, २४ एप्रिल २०२१: पुणे मुंबईसह राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून काही रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवारांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.
पवार यांनी राज्यातील तब्बल १९० साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याचे आदेश दिले आहे. या संबंधी जलदगतीने कार्यवाही करताना वसंत शुगर इन्स्टिटयूच्या वतीने त्यांनी साखर कारखान्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे, असंही आवाहन करण्यात आलेलं आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढली आहे. यामुळे राज्यातील विविध रुग्णांना ऑक्सिजनअभावी दुसऱ्या रुग्णांकडे हलवावे लागत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सूर आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशाखापट्टणम येथे ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ देखील रवाना झाली आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅंट उभारणीसाठी सुद्धा पावले टाकली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १९० कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीच्या सूचना केल्या आहेत. तसेच जे कारखाने बंद आहेत त्यांना ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे असेही आवाहन केले आहे.पवारांच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती करत सामाजिक बांधिलकी जपली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे