शरद पवारांनी रुग्णालयातून बाहेर पडताच कोरोना साठी राष्ट्रवादीकडून जाहीर केली मोठी मदत

मुंबई, १ मे २०२१: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तोंडाच्या अल्सर मुळे रूग्णालयात उपचार घेत होते. या दरम्यान देखील त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीचा सातत्याने आढावा घेतला होता. यापूर्वी देखील त्यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना ऑक्‍सिजन निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. मात्र दवाखान्यात असताना देखील त्यांनी राज्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.


शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच सर्वप्रथम राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला व कोरोनासोबतच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कोषाध्यक्षांना दिल्या.


दिरंगाई न होता तातडीनं ही मदत मिळावी यासाठी शरद पवार यांनी एका कागदाच्या कोपऱ्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात या सूचना लिहून पाठवल्या. रुग्णालयात असतानाही ते सातत्यानं कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा असो किंवा लसीकरणातली अडचणीची परिस्थिती असो वा ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधात निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती असो रुग्णालयात असतानाही ते रोज परिस्थितीचं अवलोकन करत होते.


नव्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्याच्या तिजोरीवर पडलेला ताण त्यांच्या ध्यानात आला आणि त्यांनी रुग्णालयातून घरी परतल्यावर पक्षसहकाऱ्यांना तातडीने मदतनिधीसंबंधीच्या सूचना दिल्या.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा