नवी दिल्ली, १७ मे २०२१: काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविडमुळे लागू असणाऱ्या टाळेबंदीचा परिणाम स्वस्त धान्य दुकानांच्या वेळेवरही होऊ शकतो, हे लक्षात घेऊन केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ही दुकाने महिन्यातील सर्व दिवशी सुरु ठेवावीत असे निर्देश दिले आहेत. तसेच, कोविड नियमावलीचे पालन करत या दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना/प्रधानमंत्री-गरीब कल्याण अन्न योजना III या योजनांतर्गत दिल्या जाणाऱ्या धान्याचे वितरण लाभार्थ्यांना संपूर्ण दिवसभर व्हावे म्हणून वेळेच्या पालनात सूट देणारी नियमावली काल जारी करण्यात आली आहे.
यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना III आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना या योजनांतर्गत मिळणारे धान्य या योजनांच्या लाभार्थ्यांना योग्य आणि वेळेत वितरीत होऊ शकेल.
स्वस्त धान्य दुकानांमधून गरजूंपर्यंत वेळेवर धान्य पोचण्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. या योजनेची आणि उपाययोजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या अंतर्गत मे आणि जून २०२१ या दोन महिन्यांत आधीच्याच धर्तीवर दर महिना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि गहू ही धान्ये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि पीएच या दोन्ही योजनेतील लाभांव्यतिरिक्त हे धान्य सर्व ८० कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे