लग्न म्हणजे नक्की काय ? संसार की खेळखंडोबा

मुंबई ४ जुलै २०२१: प्रसिद्ध अभिनेता-निर्माता आमिर खान आणि किरण राव यांनी तब्बल १५ वर्षानंतर आपल्या विवाहाच्या नात्याला पूर्णविराम दिला. या दोघांपासून त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. असा घटस्फोट होणे सिनेइंडस्ट्रीसाठी नवीन नाही. या पूर्वी अरबाज खान आणि मलाईका अरोरा यांनी सतरा वर्षानंतर आपले नाते संपवले. तर फरहान अख्तर आणि अदिरा यांनीदेखील घटस्फोट घेतला. ही गाडी इथेच न थांबता सेफ अली खान आणि अमृतासिंह यांनीदेखील घटस्फोट घेतला. हा सिलसिला न थांबणारा आहे, हे खरं.
पण यावरुन आता लग्न संस्था मोडकळीस येते आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्वी स्त्री केवळ चूल आणि मूल यातच रमलेली असायची. घर हेच तिचं जग होतं. पण हीच स्त्री नंतर शिकली आणि तिने प्रगती केली. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती आता प्रत्येक क्षेत्रात अधिराज्य गाजवत आहे. पण मग आता तिने संसार न करता केवळ स्वत:ला साबित करण्यासाठी झटत आहे. यासंदर्भात अक्षता विवाहसंस्थेचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ विवाहसमुपदेशक डॉ.राजेंद्र भवाळकर यांच्याशी बातचीत केली. त्यातून प्रकर्षाने जाणवलेल्या गोष्टी नमूद केल्या आहेत. सध्या एकत्र कुटूंबपद्धती फार दिसत नाही. केवळ न्यूक्लीअर फॅमिली म्हणजे नवरा, बायको आणि एक अपत्य असे कुटूंब दिसत आहे. त्यामुळे वाद झाल्यानंतर घरामध्ये समजवणारी मोठी जबाबदार व्यक्ती नाही. त्यामुळे घर तुटणे हे सर्रास दिसू लागले आहे. हे एक महत्त्वाचे कारण मानावे लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रिया पैशाने म्हणजेच आर्थिक रित्या सक्षम होत असल्याने नव-याला कमी लेखणे, हे स्त्रियांसाठी अभिमानाचे लक्षण मानले जाते. यामुळे उडणारे खटके आणि होणारे वाद यामुळे मुलांवर विपरीत प्रमाण होत असून पुढचा समाज कसा घडणार?  असा प्रश्न उभा रहात आहे. त्याचबरोबर केवळ शारिरीक आकर्षणातून होणारे प्रेमविवाह हे दो-याच्या नाजूक धाग्यासारखे असतात. जे कधीही तुटू शकतात. सिने इंडस्ट्रीच्या या वागण्याचा परिणाम सामान्य जनतेवर होताना दिसत आहे, हे नक्की.
हा परिणाम टाळण्यासाठी खास करुन लग्नाआधी समुपदेशन ही संकल्पना जी अस्तित्वात आहे, तिचा नवीन लग्न करणा-यांनी जास्तीत जास्त लाभ घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर घटस्फोट हाच केवळ उपाय नाही, तर एकमेकांना समजून घेतल्यास ही विवाह संस्था सत्यवान सावित्रीच्या नात्याप्रमाणे टिकून राहील हे खरं. पण प्रत्येक वेळी मी-म्हणजे अहंकार दोघांनी बाजूला ठेवणं, हेच या विवाहसंस्थेचं खरं मर्म आहे. तेव्हा लग्न करताना आणि केल्यानंतर ते मी शेवटपर्यंत निभावणारच , या तत्वावर ठाम रहाण्याचा सल्ला यावेळी डॉ. भवाळकर यांनी दिला.
लग्न म्हणजे जन्मगाठ, लग्न म्हणजे नातं
लग्न म्हणजे प्रेम, लग्न म्हणजे दोन जीवांची साथ
या चार ओळींनुसार लग्न करावं जपून आणि पहावं टिकवून हेच खरं मानावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा