नवी दिल्ली, १८ जुलै २०२१: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल झालेल्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा आहे. राजधानी दिल्लीत भेटीचं सत्र संपतेना तपंते आता संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट झालीय. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं. पण ही भेट सहकार कायद्यातील सुधारणांबाबत चर्चा करण्यासाठी झाल्याचं पवारांनी मोदींनी लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट झालं. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर दोघंही उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी एकाच गाडीतून रवाना झाले.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काल पवारांच्या मोदींसोबत झालेल्या बैठकीबाबत सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बैठकीची वेळ मागितली गेली, नंतर ती मान्य करण्यात आली आणि बैठक झाली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीत लेखी असे म्हटले होते की, बँक नियामक कायद्यात झालेल्या बदलांमुळे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला अधिक अधिकार दिल्यास सहकारी बँकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैला सुरु होणार आहे. १३ ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत नेत्यांची रेलचेल सुरु आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीला महत्त्व आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. सातत्याने काँग्रेस आक्रमक होत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार वेगळं समीकरण जुळवतात का असा तर्क लढवला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे