नवी दिल्ली, ३ सप्टेंबर २०२१: मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी या भेटीत राष्ट्रपतींशी नेमकी काय चर्चा केली याबाबत माध्यमांना माहिती दिली. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी जाण्या अगोदर संभाजीराजे व या नेत्यांची एक बैठकही पार पडली. यामध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती संभाजीराजे यांनी ट्विटरवर फोटो शेअर करून दिली होती.
या भेटीदरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी देखील होते. यामध्ये भाजपाकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार वंदना चव्हाण आणि काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांचा समावेश होता.
राष्ट्रपतींच्या भेटीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “१०५ घटनादुरूस्ती केली आणि राज्याला अधिकार अबाधित असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं. आम्ही देखील केंद्र सरकारचं कौतुक केलं. कौतुक करत असताना देखील लोकसभेत, राज्यसभेत आणि तेच राष्ट्रपतींना देखील आम्ही सांगितलं, की ५० टक्के मर्यादेच्यावर जर आपल्याला जायचं असेल, राज्याल जे अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये आम्हाला द्यायचे असतील. जसे की तामिळनाडू, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांना जसे दिले आहेत. पण इंदिरा साहानी केस थेट सांगतेय, की तुम्ही ५० टक्क्यांपेक्षा जास्त देऊच शकत नाही. ५० टक्क्यांच्यावर तुम्हाला जायचं असेल तर तुमची असामान्य परिस्थिती पाहिजे.”
तसेच, “१९९२ च्या इंदिरा साहानींच्या केसमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे, की असामान्य परिस्थिती म्हणजे काय? तर दूरवर व दुर्गम जर तुमचा भाग असेल तर तुम्हाला ५० टक्क्यांच्यावर आरक्षण मिळू शकते. म्हणजे १०५ घटनादुरूस्तीने राज्याला अधिकार दिलेले असले, तरी आम्ही त्यात पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आम्ही राष्ट्रपतींना विनंती केली, की ही व्याख्या या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे जर आपल्याला बदल करता आली आणि आपण जर संसदेला किंवा ज्यांना सांगायचं असेल, त्यांना सांगू शकलात. तर खऱ्या अर्थाने राज्याचे अधिकार हे अभाधित राहातील. असं आम्हाला म्हणायला काही हरकत नाही. असंही यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितलं.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे