मुंबई, 22 सप्टेंबर 2021: शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांविषयी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना 72 तासांत माफी मागण्यास सांगितलं होतं. आपल्यावरील आरोप मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा 100 कोटींचा दावा दाखल करू, अशी नोटीस अनिल परब यांनी सोमय्यांना पाठवली होती. मात्र, 72 तासानंतरही सोमय्यांनी माफी न मागितल्याने अखरे हा दावा दाखल करण्यात आला आहे.
अनिल परब यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे, असं परब यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान अनिल परब यांनी या याचिकेमध्ये 100 कोटींसोबतच किरीट सोमय्यांकडून विनाअट माफीची मागणी केली आहे. त्याचसोबत ही माफी त्यांनी दोन वर्तमानपत्रांमध्ये छापून आणावी आणि त्यांच्या ट्वीटर हँडलवर न्यायालय ठरवेल तेवढा काळ ही माफी ठेवावी, अशी देखील मागणी अनिल परब यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे