पुणे :परवा मुंबईत झालेल्या मेऴाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोपिचंद पडऴकर ढाण्या वाघ आहेत. वाघानं जंगलातल्या राजासारखं रहायला हवं असं म्हणाले. त्याचवेऴी, “मी गोपिचंद पडऴकरांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी देतोय, तुमची तयारी आहे का ?” असा प्रश्न पडऴकरांच्या कार्यकर्त्यांना विचारत बारामतीत अजित पवारांच्या विरोधात पडऴकरांना लढवण्याचे जाहिर केले. गेले अनेक दिवस या जागेवरून निवडणूक लढण्याची भाषा कोल्हापुरचे “चंपा” म्हणजे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील करत होते. मी बारामतीतून लढणार, पवारांना पाडणार वगैरे वगैरे बाता ते मारत होते. राणाभीमदेवी थाटात सतत छाती बडवत होते पण ऐनवेऴी कोथरूडला पऴून गेले. स्वत:साठी सुरक्षित मतदारसंघ शोधला. पवारांना पाडण्याची व त्यांचे राजकारण संपवण्याची भाषा करणार्या चंपांना स्वत:च्या गावात, स्वत:च्या जिल्ह्यात उभं रहायची, तिथून निवडूण यायची हिम्मत व खात्री नाही अन हे निघाले पवारांचे राजकारण संपवायला. “अल्ला मेहरबान तो गदा पहेलवान ।” अशी एक हिंदीत म्हण आहे. त्या म्हणीचा प्रत्यय इथे आल्याशिवाय रहात नाही. सत्ता हाताशी आहे म्हणून उंटाच्या बुडाचा मुका घेणं बरं नव्हे. पण सत्तेच्या स्पर्शामुऴे आपणच सर्वशक्तीमान आहोत असा भ्रम चंद्रकांत पाटलांना झालाय. चंद्रकांत पाटील इतके ताकदवर नेते आहेत, त्यांना पवारांचे राजकारण संपवायचे आहे तर कोथरूड कशासाठी ? त्यांनी बारामतीतूनच लढावे. त्यांच्या बारामती लढवायच्या वल्गना हवेत का विरल्या ? बाकी मुख्यमंत्री फडणवीस, विनोद तावडे, गिरीष महाजन किंवा पुण्याचे हिरवा देठवाले गिरीषराव ही गँग काडीने औषध लावणारी आहे. बारामतीत जावून लढायची हिम्मत यातल्या कुणाच्याच बुडात नाही. सगऴे काठावर बसून पोहणारे आहेत. त्यामुऴे ऐनवेऴी गोपिचंद पडऴकर यांच्यासारखा मोहरा सापडला आणि या सर्वांना पवारांना डिवचायची खाज भागल्यासारखे झाले. पडऴकर वाघ आहेत मग पक्षातले बाकी नेते शेर्ड (शेऴ्या) आहेत की मेढ्या ? बारामतीत पडऴकर निकरानं लढतील, ताकद पणाला लावतील. मुख्यमंत्र्यांच्या शब्दासाठी स्वत:चे राजकीय करियर पणाला लावतील. पण पडऴकरांचा बऴी गेला तर मुख्यमंत्री त्यांना काय देणार ? त्यांचे पुनर्वसन करणार की वापरून टाकून देणार ? नक्की काय प्लँन आहे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात ? मुख्यमंत्र्यांना पाहूण्याच्या काठीने साप मारून मोकऴं व्हायचं आहे की काय ? आज तमाम लोकांची हिच भावना आहे. मुख्यमंत्री पडऴकरांना संपवण्यासाठी हा गेम करतायत असे लोकांना वाटते आहे.
या निमित्ताने एक गोष्ट आठवतेय. एक काका होते. त्यांचे अन त्यांच्या शेजार्याचे पक्के वैर होते. ते दोघे एकमेकांशी बोलतही नव्हते. एके दिवशी काकाच्या घरात साप निघतो. काका व काकांची बायको आरडा-ओरडा करायला सुरूवात करतात. काकांचा आरडाओरडा ऐकून शेजारी वैरभाव विसरून पऴत येतो. भोऴा-भाबडा बिचारा तो काकांच्या घरात धाव घेतो अन काकाला विचारतो काय झालय ? काका सांगतात घरात साप निघालाय. त्यावर शेजारी काठी घेवून साप मारतो अन निघून जातो. तोवर बराच गोंधऴ होतो, कालवा होतो. या गोंधऴाने काकाचा पोरगा घरात झोपला होता तो उठतो अन बाबा बाबा कशाचा कालवा होता ? असा प्रश्न करतो. त्यावर काकाजी सगऴी हकीकत पोराला सांगतात. शेजारी येवून साप मारून गेल्याचेही सांगतात. ते ऐकून पोरगा संतापतो, बापावर चिडतो अन म्हणतो, “तुम्ही आपला वैरी घरात घेतला, त्याला आपल्या घरात पाय कसा काय ठेवू दिला ? मला उठवायचे होते, मी मारला असता साप !” वगैरे वगैरे बोलतो. यावर काकाजी अतिशय शांतपणे पोराला सांगतात, अरे वेडया तो शेजारी आपला शत्रूच आणि सापही आपला शत्रूच. हे दोघेपण आपले शत्रूच. सापाला शेजार्याने मारले तरी शत्रूच मेला आणि साप शेजार्याला चावला तरीही शत्रूच मेला. दोघातलं कुणीही मेले तर मरणार आपला शत्रूच. लेकाला बापाची हूशारी पटते अन त्याचा राग शांत होतो. फडणवीस काकांचा गेमप्लँन असा तर नाही ना ? अशी शंका आल्यावाचून रहात नाही. पडऴकरांना वाघ म्हणत बऴी द्यायची तयारी त्यांनी चालवली नाही ना ? वाघानं राजासारखं रहायचं असतं असं मुख्यमंत्री म्हणतायत. असं असेल तर पडऴकर गत पाच वर्षातली चार वर्षे भाजपसोबत होते. तेव्हा या वाघाला मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेवर घेत एखादे मंत्रीपद देवून राजासारखे का ठेवले नाही ? हा प्रश्न पडतो. मुख्यमंत्र्यांनी गत पाच वर्षात राजू शेट्टी, विनायक मेटे, महादेव जानकर, सदाशिव खोत या लोकांना जवऴ घेत बाद केले. यातल्या खोत व जानकर यांना मंत्रीपदं दिली पण मेटे व शेट्टी यांना निव्वऴ मांडी दाखवत झुलवत ठेवले. अखेर शेट्टी बाहेर पडले. मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टींची संघटना फोडली. शेट्टी व खोत यांच्यात वाद पेटवले. सदाशिव खोतांना मत्रीपद दिले अन गुलाम करून घेतले. सदाशिव खोतांनी मंत्रीपदासाठी एका झटक्यात राजू शेट्टींना व शेतकर्यांना कोलले. खोतांनी शेतकर्यांना कोलत शीएम शीएम जप चालवला. सदाशिव खोत कृषीराज्यमंत्री होते व पांडूरंग फुडकर कँबिनेट मंत्री होते. तरीसुध्दा शेतकरी आंदोलन हाताऴताना सदाशिव खोतांना पुढे करून शेतकर्यांचा सगऴा रोष खोतांच्यावर येईल अशी तजवीज केली. शेतकर्यांच्या रोषाने सरकार डँमेज होणार नाही तर खोतांचे राजकारण डँमेज होईल याची दक्षता घेतली, झालेही तसेच. आंदोलनात उतरलेले तमाम शेतकरी खोतांना शिव्या देत होते. कँबिनेट मंत्री फुंडकर व मुख्यमंत्री निवांत होते. शेतकर्यांच्या शिव्या सदाशिव खोत खात होते, पण गाजराच्या पाल्याला भुललेल्या खोतांना याचे भान नव्हते. ते धन्याची सेवा करण्यात स्वत:ला धन्य मानत होते. आज शेतकरी सदाशिव खोतांना “खुप नालायक माणूस अाहे !” असे म्हणतात. ज्या माढा मतदारसंघातील लोकांनी खोतांना निवडणूकीत मतं व पैसे दिले त्याच लोकांनी नंतर खोतांच्या गाडीवर दगडं मारली. खोत मंत्री झाले पण शेतकर्यांच्या मनातून कायमस्वरूपी उतरले. खोतांची लिडरशीप कायमस्वरूपी संपली. भविष्यात ती उभारू शकत नाही. फक्त तोंडाची टिमकी वाजवत त्यांना सत्तेच्या वऴचणीला रहावे लागेल. सदाशिव खोतांची मंत्रीपदाची झुल उतरली किंवा भाजप सरकार गेले की त्यांना हे वास्तव कऴेल. खोतांनी इथून पुढे केवऴ मुख्यमंत्र्यांचे किंवा भाजपाचे पोपट म्हणून रहायचे अशी अवस्था करून ठेवली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्व पक्षातले मात्तबर नेते असणारे एकनाथ खडसे, विनोद तावडे व पंकजा मुंडे यांनाही बाद केले. त्यांना नागपुरी हिसका दाखवला. न बोलता हा माणूस सगऴ्या विरोधकांचा बाप निघाला. “फोडा व झुंजवा !” हे समिकरण वापरत सगऴ्यांच्यावर राज्य केले. सगऴे विरोधक त्यांनी नेस्तनाबूत केले. त्यामुऴे फडणवीस पडऴकरांचे काय करणार ? बारामतीच्या म्हसोबाला सांगलीचा बऴी देवून आपली राजकीय शांती करून घेणार की काय ? असा प्रश्न पडतो.
गोपिचंद पडऴकर हे बहूजन समाजातले उभरते नेतृत्व आहे. ते बाद झाले तर एकसंघ झालेला व पडऴकरांच्यात बहूजन नेता शोधणारा समाज विस्कऴीत होईल. पुन्हा नवे नेतृत्व लवकर उभे राहणार नाही. ते राहू नये ही तर फडवणवीसांची खेऴी नसावी ना ? असा प्रश्न पडतो. हा प्रश्न तमाम लोकांच्या मनात आहे. पडऴकरांची बारामतीमधून उमेदवारी घोषित केल्यापासून लोकांना हेच वाटतय. पडऴकरांना बाद करण्यासाठी, त्यांचा बऴी देण्यासाठी व त्यांचे नेतृत्व संपवण्यासाठीच तिथे उभे केलं जातय असाच समज लोकांचा आहे. हिच चर्चा लोकांच्यात आहे. पडऴकरांनीही काऴाच्या हाका सावधपणे ऐकायला हव्यात. ते एकटे नाहीत तर त्यांच्यामागे तमाम बहूजन समाज आशा-अपेक्षा लावून बसलाय. पडऴकरांचे राजकारण कोसऴले, संपले तर या सर्व लोकांचे खच्चीकरण होवू शकते. नव्याने नेतृत्वाचा अंकूर फुटलेले शेकडो तरूण निराश होवू शकतात. एकवटेला धनगर समाज, इतर बहूजन समाज वैफल्यग्रस्त होवू शकतो. आपण नेतृत्व करू शकत नाही, आपले नेतृत्व वाढू शकत नाही असा नकारात्मक संदेश जावू शकतो. याचे भान पडऴकरांनीही ठेवायला हवे. -एक अनामिक …….