मुंबई, 4 नोव्हेंबर 2021: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ठाणे न्यायालय आणि मुंबईतील किला कोर्टानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यानंतर आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
आपल्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं सिंह यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. आयोगाच्या सुनावणीत परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पुष्टी त्यांच्या वकिलाने बुधवारी केली.
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोगाचं गठन केलं आहे. आरोगाकडून सिंह यांच्याविरोधात अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र, सिंह अद्याप एकाही सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. चौकशी आयोगाने सिंह यांच्यावर जूनमध्ये 5 हजार रुपये आणि दोन वेळा 25 हजार रुपये दंडही ठोठावला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे