बीड, 10 नोव्हेंबर 2021: इंदुरीकर महाराज आपल्या वक्तव्यांमुळं नेहमीच वादात राहिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक वेळा त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. आता पुन्हा एकदा इंदुरीकर महाराजांचं नाव चर्चेत येताना दिसतंय. बीड मधील एका शेतकरी पुत्रानं इंदुरीकर महाराजांना किर्तन करू दिले जाऊ नये अशी मागणी केलीय. ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलीय. कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, असं इंदोरीकर महाराज 3 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याविरोधात ही मागणी करण्यात आलीय.
लस घेत नाहीत, तोपर्यंत कीर्तन होऊ देऊ नये
“काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी मी लस घेणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे जनजागृती करणाऱ्यांचं खच्चीकरण होत आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज जोपर्यंत लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कीर्तन होऊ देऊ नये,” असं बीडमधील एका किसानपुत्राने म्हटलंय. या नव्या मागणीमुळे इंदोरीकर महाराज आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
इंदोरीकर महाराज काय म्हणाले होते ?
इंदोरीकर महाराज आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्मावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही, आणि घेणारही नाही असं म्हटलं होत. तीन नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना “कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका, अशी सगळी कोरोनाकाळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे