अहमदनगर, 10 नोव्हेंबर 2021: गेल्या आठवड्यात अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागात आग लागली होती. त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्वत: गुन्हा दाखल केला होता. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी आता पोलिसांनी चौघांना अटक केलीय. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांचा समावेश आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.
चौघांना अटक
वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि चन्ना यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश कालच आरोग्य विभागाने दिला आहे. त्यानंतर आज त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. यांच्यासोबत निलंबित करण्यात आलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि अन्य एका वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे परिचारिका संघटनेतर्फे संताप व्यक्त करण्यात आला आहे.
निलंबनाच्या कारवाई विरोधात परिचारिका संघटनेतर्फे सकाळीच आंदोलन करण्यात आले होते. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत ती मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना अटक झाल्याने संघटनेने यावर संताप व्यक्त केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे