मुंबई, 14 नोव्हेंबर 2021: मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोनद्वारे मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा फोन आल्यानंतर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या माहितीची गंभीर दखल घेत शोधमोहीम सुरू करून सर्व यंत्रणांना सतर्कही करण्यात आले. दरम्यान, हा फोन करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता वेगळीच माहिती समोर आली असून बॉम्बस्फोट घडवण्याचा कट ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई पोलिसांना फोन करून बॉम्बस्फोट घडवले जाण्याची शक्यता असल्याचे या व्यक्तीने सांगितले होते. हा फोन येताच मुंबई पोलिसांनी खबरदारी घेत सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक केली. मुंबईतील सर्व संबंधित यंत्रणांनाही याबाबत सूचित करण्यात आले व सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या. रात्री उशिरा ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
यापूर्वी 7 ऑगस्ट रोजीही एका निनावी फोन कॉलद्वारे सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बींच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून तातडीने शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता त्यावेळी शोधमोहीम सुरु करण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे ज्या नंबरवरुन हा फोन कॉल आला होता त्याला परत फोन लावल्यावर माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका, असं तो व्यक्ती म्हणाला. त्यानंतर त्याने आपला फोन बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. शेवटी पोलीस तपासात हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे