राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. बारामतीमध्ये जन्म झालेलं शरद पवार हे एक झंझावाती वादळ असाच उल्लेख या व्यक्तीसाठी शोभून दिसतो.
लहानपणापासूनच राजकारणाची आवड असलेल्या शरद पवारांनी त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
इ.स. १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला. त्यानंतर १० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची’ स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
इ.स. २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे इ.स. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै इ.स. २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली. इ. स्. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५२ जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता.
केवळ राजकारणातच नव्हे तर संगीत क्रिकेट या इतर विषयातही रुची असणाऱ्या शरद पवारांची ९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. १ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.
असा हा हरहु्न्नरी राजकीय खेळाडू या पटावर पुन्हा होणे नाही.कॅन्सर सारख्या दुर्दम्य आजारातून खंबीरपणाने उभे राहून आज त्यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली. या राजकारण्याला वंदन करताना एवढेच म्हणावेसे वाटते. …
जिवेत शरद: शतम्
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस