मुंबई, 1 जानेवारी 2022: लुधियाना कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आरोपी जसविंदर मुलतानी याच्याविरुद्ध भारतात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलतानी सध्या जर्मनीत आहे. जर्मनीतील पोलिसांकडून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. शीख फॉर जस्टिस संघटनेचा (SFJ) सदस्य जसविंदर सिंग मुलतानीला ताब्यात घेतल्यानंतर आणि जर्मनीत चौकशी केल्यानंतर, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये नियोजित दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळाली असल्याचं सांगितलं जात आहे..
या प्रकरणावरून आता या नंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, लुधियाना न्यायालयातील बॉम्बस्फोटांशी कथित संबंध असलेल्या शीख फॉर जस्टिस संघटनेचा (SFJ) सदस्य जसविंदर सिंग मुलतानीला ताब्यात घेतल्यानंतर आणि जर्मनीत चौकशी केल्यानंतर, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये नियोजित दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळाली होती.
याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला माहिती मिळाली आहे की एसजीएफ व्यतिरिक्त, इतर प्रतिबंधित खलिस्तान समर्थक गट मुंबई, दिल्ली आणि इतर शहरांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या संपर्कात आहेत.”
शीख फॉर जस्टिस या संघटनेवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला असून सतर्क राहण्यास आणि संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.
सरकार मुलतानीला भारतात आणणार
एसएफजे या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित मुलतानीच्या चौकशीसह त्याला भारतात आणण्याचीही योजना आहे. यासाठी सरकार मुत्सद्दी माध्यमांद्वारे प्रकरण पुढे नेत आहे. मुलतानी याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून पंजाबमधील तरुणांना खलिस्तानी अजेंडाचा प्रचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय तरुणांना दहशतीच्या मार्गावर ढकलत आहे. पंजाब निवडणुकीपूर्वी येथे अस्थिरता निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांनी अचानकपणे आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. लुधियाना बॉम्बस्फोट घडवण्यात मुलतानीच्या भूमिकेचे महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.
मुलतानीची चौकशी
नुकतेच जसविंदर मुलतानीला जर्मनीतील एरफर्ट येथे अटक करण्यात आल्याचे वृत्त आले होते. मात्र, यानंतर SFJ प्रमुख अवतार पन्नूने एक व्हिडिओ जारी केला. ज्यामध्ये त्याने दावा केला आहे की मुलतानी त्याच्या घरात आहे आणि त्याला कोणीही अटक केली नाही. मात्र, यावर तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की, मुलतानीला अटक करण्यात आली नसून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर जर्मन पोलिसांनी त्याची चौकशी केली. तो अजूनही तपास यंत्रणेच्या रडारवर आहे.
बडतर्फ केलेल्या हेड कॉन्स्टेबलने केला होता स्फोट
लुधियानाच्या कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये बॉम्बस्फोट झाला होता. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ज्याच्या तपासात मृत व्यक्ती तिथे बॉम्ब ठेवण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. पंजाब पोलिसांचे बडतर्फ हेड कॉन्स्टेबल गगनदीप सिंग असे त्याचे नाव आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे