रेशनच्या वाढत्या खर्चानं सर्वसामान्यांचं मोडलं कंबरडं, किरकोळ महागाईनं सलग तिसऱ्या महिन्यात घेतली उसळी

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022: स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या रेशनच्या खर्चात सातत्यानं वाढ होत आहे. खाद्यतेलाच्या दरवाढीमुळं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. तर उरलेली कसर महागलेलं पेट्रोल आणि वाढलेले बिजदर यांनी पूर्ण केली. यामुळं डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.59% वर पोहोचलाय. हा आकडा भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या महागाई दराच्या कमाल मर्यादेच्या अगदी जवळ आहे.

खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं बुधवारी किरकोळ महागाई दर(Retail Inflation Rate December 2021) डिसेंबर 2021 ची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार अन्नधान्य आणि रेशनच्या किमतीत वाढ झाल्यानं महागाईचा दर वाढलाय. डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 4.05 टक्के झाला आहे. जो नोव्हेंबर 2021 मध्ये केवळ 1.87% होता.

सरकारच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये, भाज्यांच्या महागाईचा दर गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत कमी झालाय आणि त्यात 2.99% ची घट झालीय. या कालावधीत खाद्यतेलाच्या महागाई दरात 24.32% आणि इंधन आणि विजेचा महागाई दर देखील 10.95% इतका वाढलाय.

सलग तिसऱ्या महिन्यात महागाई वाढली आहे
यापूर्वी, नोव्हेंबर 2021 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 4.91% होता, ऑक्टोबरमध्ये 4.48% होता. तर सप्टेंबर 2021 मध्ये ऑगस्ट 2021 च्या तुलनेत ते 4.35% पर्यंत खाली आले होते. ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा 5.3% होता. तर गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये हा दर 4.59% होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महागाई दर 4% चं लक्ष्य ठेवलं आहे. यामध्ये 2% वर किंवा खाली जाईल एवढा मर्जिन ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारे डिसेंबर 2021 चा किरकोळ चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या कमाल मर्यादेच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये 9 वेळा कोणताही बदल केलेला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा