भारताचा 96 धावांनी दणदणीत विजय; टी-20 नंतर वनडेमध्येही क्लीन स्वीप

IND vs WI 3rd ODI, 12 फेब्रुवारी 2022: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडीजला 3-0 अशी धूळ चारली आहे. काल रंगेलल्या तिसऱ्या वनडेत भारताने पाहुण्या संघाला 96 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 50 षटकात भारतीय संघाचा डाव 265 धावांवर आटोपला. आघाडीची फळी उद्ध्वस्त झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतके ठोकली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ 169 धावांपर्यंतच पोहोचू शकला. प्रसिध कृष्णा, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज या भारताच्या वेगवान त्रिकुटाने जबरदस्त गोलंदाजी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. श्रेयस अय्यरला सामनावीर, तर प्रसिध कृष्णाला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

एकदिवसीय आणि टी-20 मध्ये विराट कोहलीच्या जागी भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून रोहित शर्माने शानदार पदार्पण केलंय. भारतीय संघाचा नियमित कर्णधार झाल्यानंतर, रोहित शर्माने एक टी-20 आणि एक वनडे मालिका खेळली आणि दोन्हीमध्ये विरोधी संघाचा सफाया केला. सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना शुक्रवारी (11 फेब्रुवारी) खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने 96 धावांनी विजय मिळवत मालिका 3-0 ने जिंकली.

खरं तर, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विराट कोहलीने टी-20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्याकडून एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद काढून घेतले आणि दोन्ही फॉरमॅटची कमान रोहित शर्माकडं सोपवली.

टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा केला क्लीन स्वीप

कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहितने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध पहिली मालिका खेळली. या टी-20 मालिकेत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता, मात्र रोहित दुखापतीमुळं या दौऱ्यातून बाहेर पडला होता. या दौऱ्यावर भारतीय संघाला केएल राहुलच्या नेतृत्वाखालील वनडे मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

आता एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिज संघाचा दारुण पराभव

दक्षिण आफ्रिकेनंतर आता भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्माचं पुनरागमन झालं. हे पुनरागमन पुन्हा एकदा धमाकेदार ठरलं. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग दुसरी मालिका क्लीन स्वीप करून जिंकली. यावेळी वेस्ट इंडिजचा बळी गेला.

आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी-20 मालिका खेळायच्या आहेत. हे सामने 16, 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जातील.

कोहलीचा कर्णधार असूनही रोहितला मधल्या काही मालिकांमध्ये कर्णधारपदाची संधी मिळाली आहे. अशा स्थितीत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 35 सामने खेळले आहेत, त्यापैकी 29 जिंकले आहेत आणि फक्त 6 पराभव पत्करावा लागला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा