चाकण MIDC मधील मर्सिडीज कार प्लांटमध्ये घुसला बिबट्या आणि मग…

12

पुणे, 22 मार्च 2022: चाकण MIDC परिसरात मर्सिडीज बेंझ प्लांट आहे. येथे अचानक एक बिबट्या कंपनीच्या प्लांटमध्ये घुसला. कंपनीत काम करणाऱ्या लोकांनी बिबट्याला पाहिल्यानंतर घबराट पसरली. प्लांटमधील कर्मचारी बचावासाठी इकडे तिकडे धावू लागले. कर्मचाऱ्यांनी ही बाब तत्काळ वनविभागाच्या पथकाला व पोलिसांना कळवली. यानंतर टीम पोहोचली आणि सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेपाच वाजता प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कार निर्माता मर्सिडीज बेंझच्या चाकण प्लांटमध्ये अचानक बिबट्या घुसला. बिबट्याला पाहताच या कंपनीत काम करणारे सर्व कर्मचारी घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी लपून बसलेले दिसले. सुमारे 2 तास कंपनीत गोंधळाचे वातावरण होते.

बिबट्याला आधी बेशुद्ध करण्यात आले

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्थानिक पोलीस ठाणे आणि वनविभागाला माहिती दिली. यानंतर पोलीस व वनविभागाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि घाबरलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेले. मर्सिडीज बेंझ प्लांटमध्ये घुसलेला बिबट्या कोणावरही हल्ला करण्याआधीच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी डॉट इंजेक्शनच्या सहाय्याने त्याला शांत केले. यानंतर बिबट्याला वनविभागाच्या पिंजऱ्यात टाकून जुन्नर जंगलात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे