इस्लामाबाद, 10 एप्रिल 2022: पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये शनिवारी-रविवार रात्री इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील मतदानात इम्रान खान यांचा पराभव झाला. पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे खासदार आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत.
शाहबाज शरीफ 13 ऑगस्ट 2018 पासून नॅशनल असेंब्लीचे सदस्य आहेत आणि विरोधी पक्षनेतेही आहेत. यापूर्वी शाहबाज शरीफ हे तीन वेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते पंजाबचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्या शरीफ पीएमएल-एनचे अध्यक्ष आहेत.
हे कुटुंब अमृतसरहून लाहोरला आले होते
शाहबाज शरीफ यांचा जन्म 23 सप्टेंबर 1951 ला लाहोरमध्ये झाला. त्यांचे वडील मुहम्मद शरीफ हे व्यापारी होते. व्यवसायानिमित्त ते अनेकदा काश्मीरच्या अनंतनागला जात असे. पुढे त्यांचे कुटुंब अमृतसर येथे स्थायिक झाले.
1947 मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा मुहम्मद शरीफ आपल्या कुटुंबासह लाहोरमध्ये स्थायिक झाले. शाहबाज शरीफ यांच्या आई पुलवामा येथील रहिवासी होत्या. लाहोरमधील सरकारी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर शाहबाज यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळला.
शाहबाज यांना अब्बास शरीफ आणि नवाझ शरीफ हे दोन मोठे भाऊ आहेत. नवाझ शरीफ हे तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. 1973 मध्ये शाहबाज यांनी आपल्या चुलत बहिणीशी लग्न केले. दोघांना चार मुले आहेत. 2003 मध्ये शाहबाज यांनी दुसरे लग्न केले. असे मानले जाते की शाहबाज त्यांचा भाऊ नवाजपेक्षा जास्त श्रीमंत आहे.
अशी झाली राजकीय कारकिर्दीची सुरुवात
शाहबाज शरीफ यांचा राजकारणात प्रवेश 80 च्या दशकात झाला. 1988 मध्ये त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. पंजाब प्रांतातील लाहोर विधानसभेतून त्यांनी निवडणूक जिंकली. मात्र, 1990 मध्ये विधानसभा विसर्जित करण्यात आली. 1990 मध्ये त्यांनी पंजाब प्रांतातून पुन्हा निवडणूक जिंकली. त्याच वर्षी त्यांनी नॅशनल असेंब्लीची निवडणूकही जिंकली. दोन्ही विजयानंतर त्यांनी नॅशनल असेंब्लीची निवड केली. 1993 मध्ये नॅशनल असेंब्लीही विसर्जित करून त्यांचे सदस्यत्व गमावले. 1993 मध्ये त्यांनी पुन्हा लाहोर विधानसभा आणि नॅशनल असेंब्लीच्या निवडणुका जिंकल्या. यावेळी त्यांनी नॅशनल असेंब्लीची जागा सोडली.
पंजाबचे तीन वेळा मुख्यमंत्री
1997 मध्ये त्यांनी पुन्हा पंजाब प्रांताची निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी पीएमएल-एनच्या तिकिटावर निवडणूक लढवली. फेब्रुवारी 1997 मध्ये शाहबाज शरीफ पहिल्यांदा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री बनले. 1999 मध्ये पाकिस्तानात लष्कराने सत्तापालट केला होता. शाहबाज शरीफ यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्चीही गेली. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला देश सोडून दुबईला जावे लागले. 2007 मध्ये शाहबाज शरीफ आणि त्यांचे कुटुंब पुन्हा पाकिस्तानात परतले. जून 2008 मध्ये शाहबाज पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. 2013 च्या निवडणुकीत शाहबाज तिसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री बनले.
2018 मध्येही होते पंतप्रधानपदाचे दावेदार
2018 मध्ये पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पीएमएल-एनने शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. मात्र, इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने ही निवडणूक जिंकली. शाहबाज शरीफ यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
सप्टेंबर 2020 मध्ये शाहबाज शरीफ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. एप्रिल 2021 मध्ये त्यांना लाहोर हायकोर्टातून जामीन मिळाला. शाहबाज शरीफ यांच्याविरोधात हा खटला सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे