नाटो देशांवर सूड उगवण्यास सुरुवात! पुतिन यांनी या दोन देशांचा गॅस पुरवठा केला खंडित

Russia Ukraine War, 28 एप्रिल 2022: रशिया आणि युक्रेनमधील युद्धात युक्रेनला उघडपणे मदत करणं आणि रशियाचं म्हणणं न मानणं युरोपातील काही देशांना महागात पडताना दिसत आहे. अत्यंत कठोर पावलं उचलत रशियाने पोलंड आणि बल्गेरियाचा गॅस-तेल पुरवठा बंद केलाय. गेल्या महिन्यात पुतिन यांनी रशियाकडून गॅस-तेल खरेदी करणाऱ्या देशांना रशियन चलन रुबलमध्ये पैसे देण्यास सांगितलं होतं, परंतु युरोपातील देशांनी पुतीन यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला होता. यानंतर आता पुतिन यांनी कडक कारवाई करत पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

पोलंड आणि बल्गेरियाच्या मते, रशियन ऊर्जा दिग्गज गॅझप्रॉमने त्यांना सांगितलं की ते गॅसचा पुरवठा थांबवत आहेत. पोलिश गॅस कंपनी पीजीएनआयजीने सांगितलं की रशियाने यमल-युरोप पाइपलाइनद्वारे गॅस वितरण थांबविण्याचा निर्णय घेतलाय. त्याच वेळी, बल्गेरियाच्या ऊर्जा मंत्रालयाने म्हटलंय की रशिया देखील तुर्कस्ट्रीम पाइपलाइनद्वारे बल्गेरियाला येणारा गॅस पुरवठा थांबवत आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सुरुवातीपासूनच पोलंड उघडपणे युक्रेनला पाठिंबा देत आहे. पोलंडने युक्रेनला युद्ध लढण्यासाठी अनेक शस्त्रंही दिली आहेत. पोलंडच्या सरकारने या आठवड्यात सांगितलं की ते युक्रेनियन सैन्याला टँक पाठवत आहेत. युरोपमध्ये रशियामधून येणारा नैसर्गिक वायू घरं गरम करण्यासाठी, वीज निर्माण करण्यासाठी आणि इंधन म्हणून वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

आतापर्यंत सर्व युरोपियन देश सुमारे 60 टक्के युरोमध्ये आणि उर्वरित डॉलरमध्ये देत आहेत. युक्रेनबरोबरच्या युद्धानंतर, पिटॉनने मागणी केली की हे पेमेंट पूर्णपणे रूबलमध्ये केले जावे. यावर युरोपीय देशांच्या नेत्यांनी हे पूर्वनिर्धारित अटीचे उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं ते रुबलद्वारे पैसे देणार नाहीत. पोलंड दरवर्षी सुमारे 9 अब्ज घन मीटर रशियन वायू आयात करतो. याद्वारे देशाच्या सुमारे 45 टक्के गरजा भागवल्या जातात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा