नवी दिल्ली, 3 मे 2022: चीनने वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) पॅंगॉन्ग त्सोच्या दक्षिणेकडील किनारी नवीन पुलाच्या आसपास संभाव्य रस्त्यांच्या नेटवर्कवर काम सुरू केलंय. याबाबतची सॅटेलाइट छायाचित्रे समोर आली आहेत. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) कडं उपलब्ध असलेल्या फोटोंमधील कमी रिझोल्यूशनमुळं, नवीन बांधकामाची स्थिती काय आहे हे स्पष्ट नाही. मात्र, पुलाच्या दक्षिणेकडील रस्त्याचे काम छायाचित्रातून स्पष्टपणे दिसून येते.
या वर्षाच्या सुरुवातीला अशी माहिती होती की, हा पूल जानेवारीमध्ये पूर्ण होणार होता. याआधी भारत सरकारने चीनने केलेल्या पुलाचे बांधकाम ‘बेकायदेशीर’ असल्याचं म्हटलं होतं.
हा पूल 1962 पासून बेकायदेशीर चिनी कब्जात असलेल्या भागात बांधला जात होता. भारत सरकारने हा अवैध धंदा कधीच मान्य केलेला नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तलावाच्या उत्तरेकडील किनार्यापासून पुलाचं बांधकाम सुरू झाल्याचे सॅटेलाइट इमेजेसवरून दिसून येते.
आलं सरकारचं उत्तर
अलीकडेच, सरकारने संसदेत म्हटले होते की, चीनकडून पॅंगॉन्ग तलावावर बांधण्यात येत असलेल्या पुलाकडे लक्ष दिलं जात आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी संसदेत सांगितलं की, भारताने हा अवैध धंदा कधीच स्वीकारलेला नाही. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि शेजारील देशांनी भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करावा अशी आमची अपेक्षा आहे, असं सरकारने अनेक प्रसंगी स्पष्ट केलंय.
पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर चीनचा भर
ऑगस्ट 2020 मध्ये भारतीय सैन्याने पॅंगॉन्ग तलावाच्या दक्षिणेकडील अनेक शिखरं काबीज केल्यानंतर चीन आपल्या लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देत आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की पॅंगॉन्गमधील हा चीनी पूल सप्टेंबर 2020 मध्ये पॅंगॉन्ग तलावाच्या दक्षिणेकडील कैलास शिखर काबीज करण्याच्या भारतीय लष्कराच्या आक्रमक हालचालीला थेट प्रत्युत्तर आहे.
चीनला भारतीय लष्करापासून वाटत होता धोका
खरं तर, त्यावेळी चिनी सैन्याच्या तैनातीला भारतीय सैन्याकडून खूप धोका वाटत होता, त्यामुळे त्यांना इतर ठिकाणांहून सैनिकांना परत आणून तलावाच्या आसपासच्या परिसरात तैनात करावं लागलं. पॅंगॉन्ग सरोवरावरील चीनचा नवीन पूल त्या भागातील चिनी सैन्याला उत्तम रसद पुरवेल आणि चीनला तलावाच्या कोणत्याही बाजूने त्वरीत सैन्य जमा करण्याची क्षमता देईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे










































