‘माफी मागा नाहीतर मी अयोध्येत येऊ देणार नाही’, भाजप खासदाराचं राज ठाकरेंना खुले आव्हान

लखनऊ, 6 मे 2022: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध सुरू झालाय. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय. त्यांनी ट्विट करून म्हटलंय की, मी राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेत येऊ देणार नाही, अयोध्येत येण्यापूर्वी राज ठाकरेंनी सर्व उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी.

कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ट्विट केलं की, “उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्या सीमेवर येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी. राज ठाकरे माफी मागून अयोध्येत यावेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन करताना भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, “जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींना राज ठाकरेंना भेटू नये अशी विनंती करतो.”

राममंदिर आंदोलनात ठाकरे कुटुंबीयांच्या भूमिकेचा संदर्भ देत भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका राहिली आहे. त्याच, ठाकरे कुटुंबीयांचा याच्याशी काहीही संबंध नाही.”

विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी कुटुंबासह अयोध्येला जाणार आहेत. ते कुटुंबासह रामजन्मभूमी आणि हनुमानगढी येथील रामलला येथे दर्शन-पूजा करणार आहेत. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्येत होर्डिंग्ज लावण्यात येत आहेत. या होर्डिंग्जवर लिहिलं आहे- ‘राज’ तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी.

मुंबईतही मनसेने राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी ‘चलो अयोध्या’चे पोस्टर लावले आहेत. पोस्टरमध्ये लोकांना राज ठाकरे यांच्या 5 जूनच्या अयोध्या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलंय. राज ठाकरे यांनी स्वतः अयोध्येत येण्याची घोषणा केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा