मुंबई, 31 मे 2022: पायाचे दुखणे वाढल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी आपल्या पुण्यातील सभेतून दिली होती. या कारणास्तव आज राज ठाकरे रुग्णालयात दाखल होणार आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी आज लीलावती रुग्णालयात राज ठाकरे यांना ऍडमीट करण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांना गेल्या काही महिन्यांपासून पायाच्या दुखण्यानं त्रास होत होता. हे दुखणं वाढल्यामुळे आणि वेदना असह्य झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. या कारणास्तव आज राज ठाकरे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल होणार आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया उद्या करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया होणार असल्याने त्यांना एक दिवस आधीच रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला होता.
राज ठाकरे 5 जून रोजी आयोध्या च्या दौर्यावर जाणार होते. वाढलेल्या पायाच्या दुखण्यामुळं त्यांनी आपला हा दौरा देखील रद्द केल्याचं सांगितलं. पुण्यात झालेल्या आपल्या सभेत त्यांनी याबाबत सांगितलं होतं. राज ठाकरे म्हणाले होते की, “मी जेव्हा मागे पुण्यात आलो होतो, तेव्हाच मला पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. जेव्हा मी मुंबईत परतलो तेव्हा काही टेस्ट करण्यात आल्या होत्या. या टेस्टनंतर डॉक्टरांनी मला मला हिप बोनचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. एक जूनला हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणारे. म्हणूनच मी मुद्दामहून तुम्हाला याबद्दल माहिती दिली. तुम्हाला न सांगताच शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो तर पत्रकार काहीही सांगू शकतात.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे