India vs Korea Asia Cup 2022, 1 जून 2022: भारतीय हॉकी संघ आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. मंगळवारी खेळल्या गेलेल्या सुपर-4 टप्प्यातील अंतिम सामन्यात भारत आणि कोरिया यांच्यातील सामना 4-4 असा बरोबरीत सुटला. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला कोरियाला हरवायचे होते, मात्र टीम इंडियाला तसे करता आले नाही. आता अंतिम लढतीत कोरिया आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे, तर बुधवारी कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय संघ जपानशी भिडणार आहे.
भारताकडून नीलम संजीव जेस (9व्या मिनिटाला), मनिंदर सिंग (21व्या मिनिटाला), बीएम सेशे गौडा (22व्या मिनिटाला) आणि मारिसवरेन शक्तीवेल (37व्या मिनिटाला) यांनी गोल केले. कोरियासाठी जँग जोंगह्युन (13व्या मिनिटाला), जे. चेऑन (18व्या), किम जंग-हू (28व्या) आणि एम. जुंग (44व्या) यांनी गोल केले.
ही प्रतिष्ठित स्पर्धा पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे. मात्र, यजमान भारतीय संघ विश्वचषकासाठी आधीच पात्र ठरला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत, जपान, पाकिस्तान आणि यजमान इंडोनेशियाला पूल-अ मध्ये स्थान मिळाले होते. तर मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांगलादेश यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. पुढे भारताशिवाय जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियाने सुपर-4 टप्प्यात स्थान मिळवले.
सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात भारताने जपानचा 2-1 असा पराभव केला. त्यानंतर मलेशियासोबत तीन-तीन बरोबरी खेळली. कोरिया, जपान आणि मलेशिया सुपर-4 मध्ये स्थान मिळवल्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरले. हे चार संघ एकदा एकमेकांशी भिडले होते, त्यानंतर आता अंतिम सामना अव्वल दोन संघांमध्ये होणार आहे.
टीम इंडियाने या स्पर्धेत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी बिरेंदर लाक्राकडे आहे. त्याचवेळी सरदार सिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आशिया चषक स्पर्धेचा शेवटचा हंगाम 2017 मध्ये खेळला गेला होता, जेव्हा भारतीय संघाने मलेशियाचा पराभव करून तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे