नवी दिल्ली, 8 जून 2022: अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. गुजरात, यूपी, मुंबई आणि दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्यास तयार असल्याची अधिकृत धमकी अल कायदाने दिली. त्याचबरोबर भाजप लवकरच संपुष्टात येईल असंही अल कायदा ने म्हटलंय. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी टीबीच्या चर्चेदरम्यान दिलेल्या वक्तव्याबाबत अल कायदाने ही धमकी दिलीय. या वादाचाही त्यांनी आपल्या संदेशात उल्लेख केलाय.
अल-कायदाने सांगितलं की, काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या प्रचारकाने टीबीच्या चर्चेदरम्यान इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळं जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ, असंही अल कायदाने पुढं म्हटलंय. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. पैगंबर मुहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू. आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या युवकांच्या शरीराला स्फोटके जोडू जेणेकरून अशा लोकांना उडवता येईल.
पैगंबर मुहम्मद यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. तो त्याच्या घरात लपू शकणार नाही किंवा सुरक्षा दलही त्याला वाचवू शकणार नाही.
नुपूर शर्माला दिल्ली पोलिसांनी दिली सुरक्षा
पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा जोर धरत आहे. या प्रकरणात नुपूर शर्माकडून धमक्या मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्माला सुरक्षा पुरवली आहे.
तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार नुपूर शर्माने दिल्ली पोलिसांकडे केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आता दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
12 मुस्लिम देशांनी आक्षेप घेतला होता
अरबस्तानातील अनेक इस्लामिक देशांनी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजप प्रवक्त्यांच्या विधानावर आतापर्यंत 12 देशांनी आक्षेप घेतलाय. ज्यामध्ये कतार, UAE, इराण, कुवैती, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, इंडोनेशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांचा समावेश आहे. मात्र, भाजपकडून दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आलीय. नुपूर शर्माला पक्षाने निलंबित केले आहे, ज्यांनी तिच्या शब्दाबद्दल माफी मागितली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे