इतका आहे राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा…

11

मुंबई, 23 जून 2022: राज्यात सर्वत्र पाउस सुरू झालाय. दरम्यानच्या काळात पावसाने दडी मारली होती. शेतकरी देखील चिंतेत पडले होते. पेरण्या खोळंबल्या होत्या. जूनचा अर्धा महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र आता राज्यात सगळीकडेच पावसाला सुरुवात झाली असून पाणीसाठ्यत भर पडताना दिसत आहे. असं असलं तरी अजूनही काही ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 20 जूननुसार 20.32 टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात 32.81 टक्के, मराठवाडा विभागात 26.8 टक्के, कोकण विभागात 35.12 टक्के, नागपूर विभागात 27.39 टक्के, नाशिक विभागात 21.21 टक्के, पुणे विभागात 13.28 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अधिग्रहित केलेल्या विहिरी आणि विंधन विहिरींची संख्या 2267 इतकी आहे.

राज्यात 527 टँकर्सने पाणीपुरवठा

राज्यात 20 जूननुसार 634 गावे आणि 1396 वाड्यांना 527 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या 88 तर खाजगी टँकर्सची संख्या 439 इतकी आहे. मागील आठवड्यात टँकर्सची संख्या 501 इतकी होती. पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे एक-दोन दिवसात टँकर्स कमी होतील अशी आशा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे