खासदार भावना गवळींचा बंडखोरांच्या सुरात सूर, ठाकरेंना लिहिलं पत्र

मुंबई, 23 जून 2022: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात शिवसेना खासदार भावना गवळी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या सुरात सुर मिळवताना दिसत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पत्र लिहून बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार करून या नेत्यांवर कठोर कारवाई करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

हिंदुत्वाच्या बाजूने असलेल्या बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार व्हायला हवा, असं त्यांनी पत्रात लिहिलंय. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राजकीय गोंधळाबाबत फेसबुक लाईव्ह करून राज्यातील जनता आणि शिवसैनिकांना संबोधित केलं. मी नको असेल तर समोर येऊन बोला असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

बुधवारी होणाऱ्या पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला शिवसेनेने सर्व आमदारांना उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. सोबतच या बैठकीला आमदार उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. भावना गवळी म्हणाल्या की, बंडखोर आमदार शिवसैनिक आहेत, त्यामुळं त्यांच्यावर कठोर कारवाई करू नये.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा