आळंदी, 12 जुलै 2022: पुण्यातील आळंदीच्या माजी शहाराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्यासह त्यांचे पती आणि मुलाला अटक करण्यात आलीय. सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी प्रियांकाचे वडील अनिल घोलप यांनी आळंदी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
प्रियंका ही पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी होती. नोव्हेंबर महिन्यात प्रियंकाचा विवाह अभिषेक उमरगेकर यांच्यासोबत झाला होता. परंतु विवाहाच्या काही महिन्यांतच प्रियांकाने आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उमरगेकर त्यांचे पती अशोक वय वर्ष 60 यांनी सुनेचा छळ केला आणि त्याना मुलगा अभिषेकने साथ दिली. लग्नानंतर लगेचच सासरच्यांनी मुलीच्या संसारोपयोगी साहित्य तसंच फर्निचर कधी आणणार यावरुन मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यातूनच प्रियंका उमरगेकरने आत्महत्या केली. असा आरोप तिच्या कुटुंबियांनीही केला आहे.
त्यानुसार आळंदी पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय हुंड्यासाठी पैशाची मागणी केली जात होती. असंही गुन्हात नमूद करण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
प्रियंका आणि अभिषेक यांच्यात रविवारी वाद झाला होता. दोघामध्ये वाद झाल्यानंतर बेडरुमध्ये जाऊन प्रियंकाने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंत चव्हाण रूग्णालयात पाठविण्यात आला. अहवालात प्रियंका उमरगेकरने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.
न्यूज अनकट प्रतिनिधी












































