National Herald Case, ४ ऑगस्ट २०२२: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सध्या सुरू असलेला ईडीचा तपास आता चौकशीनंतर कारवाईपर्यंत पोहोचलाय. मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर ईडीने बुधवारी दिल्लीतील हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियनचं कार्यालय सील केलं.
कार्यालय सील होताच दिल्लीत खळबळ उडालीय. काँग्रेस मुख्यालयापासून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. ईडीच्या कारवाईनंतर काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर धमकावल्याचा आरोप केला.
काँग्रेस आता गुरुवारीही हा मुद्दा संसदेत मांडणार आहे. दुसरीकडं, नॅशनल हेराल्डशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्याचे समोर आलंय. त्याचे धागे दोरे हवालाशी जोडलेले दिसत असल्याचं सांगितलं जात आहे.
ईडीने मंगळवारी टाकलेल्या छाप्यांमध्ये काही हवाला कनेक्शन समोर आल्याची माहिती मिळाली आहे. खाते पुस्तकातील नोंदीमध्ये काही संशयास्पद व्यवहार दाखविण्यात आले आहेत. या हवाला नोंदी कोलकाता आणि मुंबईत सापडल्या आहेत.
दुसरीकडं, काँग्रेस ईडी आणि पोलिसांवर नाराज आहे. बुधवारी काँग्रेसने सर्वप्रथम पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. या पत्रकार परिषदेत जयराम रमेश, अजय माकन आणि अभिषेक मनू सिंघवी उपस्थित होते. सरकार धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तिघांनी केला. भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. पण ते झुकणार नाहीत. महागाईविरोधात ५ ऑगस्टला आंदोलन करणार असल्याची भीती व्यक्त करत ईडी सरकारच्या इशाऱ्यावर कारवाई करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केलाय.
काँग्रेस संसदेत आवाज उठवेल
त्यानंतर हा मुद्दा गुरुवारी संसदेत उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस पक्षाने गुरुवारी सकाळी ९.४५ वाजता काँग्रेस संसदीय पक्षाची (सीपीपी) बैठक बोलावलीय. यामध्ये काँग्रेसच्या सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांना पाचारण करण्यात आलंय. यामध्ये पक्षाच्या भावी रणनीतीवर चर्चा होणार आहे. बुधवारी झालेल्या संपूर्ण घडामोडीबाबत काँग्रेस संसदेत स्थगन प्रस्ताव आणणार आहे. दरम्यान, राहुल गांधीही कर्नाटकातून दिल्लीत परतले आहेत.
राहुल गांधींची ५० तास, सोनिया गांधींची १२ तास चौकशी करण्यात आली
नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची वेगवेगळ्या दिवशी ५० तास चौकशी करण्यात आली. त्याचवेळी सोनिया गांधींसोबत १२ तास प्रश्नोत्तरं झाली. यानंतर ईडीने मंगळवारी नॅशनल हेराल्डसह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास दिल्लीतील यंग इंडियनचं कार्यालय ईडीने सील केलं.
ईडीने ज्याप्रमाणे संजय राऊत, पार्थ चॅटर्जी, सत्येंद्र जैन यांना चौकशीनंतर अटक केली होती, त्याचप्रमाणे सोनिया गांधी-राहुल गांधी यांच्यावर ईडी असे काही पाऊल उचलू शकते का? काँग्रेस कार्यालय, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या घराबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात आल्यानं ही भीती होती. त्यावर काँग्रेसने त्यांना वेठीस धरल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी तर देशातील सर्वात जुन्या पक्षाला दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे, हे योग्य नाही, असंही म्हटलंय.
आता या प्रकरणाला पुन्हा गती मिळताना दिसत आहे. एकीकडं त्याची तार हवालाशी जोडल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडं काँग्रेस संसदेत हा मुद्दा जोरात मांडणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे