सांगली, ५ ऑगस्ट २०२२: सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील औदुंबर-भिलवडी नदीकाठी जवळपास दहा लहान मोठ्या मगरींचा अधिवास पाहायला मिळाला आहे. यंदा कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींच्या स्थलांतराला ब्रेक मिळाला आहे. दरवर्षी जुलै ऑगस्ट दरम्यान पावसाळ्यात कृष्णा नदीची पूरस्थिती असते. अशावेळी मगरींचा नदीच्या बाजूला, ओढे, पाणवठे, शेतांमध्ये वावर पाहायला मिळायचा. या वर्षी पाणीपातळी स्थिर असल्याने मगरींनी आपला अधिवास सोडला नाही. त्यांचा नदीतच वावर आहे. या मगरींचा आकार पाच फुटांपासून ते चौदा फुटांपर्यंत आहे.
कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी मगरींचा अधिवास आहे. कृष्णाकाठी ठीक ठिकाणी मैला मिश्रित पाणी नदीत मिसळते त्या त्या ठिकाणी तिलापीया मासे प्रचंड वाढले आहेत. तिलापीया माशांमुळे नदीतील इतर मासे नष्ट होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. मात्र या तिलापीया माशांवर ताव मारण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षात मगरींचा अशा पाणवठ्यावर वावर वाढला असून या माशांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणाऱ्या मगरींचे अस्तित्त्व कृष्णा नदीमध्ये टिकणं अत्यंत गरजेचे आहे.
कृष्णा नदी ही मगरींची नदी म्हणूनच ओळखली जाते.कृष्णा नदीत सातत्याने कारखान्यातील सोडल्या जाणाऱ्या रासायनिक मळीच्या जलप्रदूषणामुळं नदीतील जैवविविधता धोक्यात आली असून तातडीने यावर उपाय शोधले जावेत अशी मागणी परिसरातील नागरिक आणि निसर्गप्रेमी सातत्याने करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी- गुरूराज पोरे