न्यूयॉर्कमध्ये पुन्हा तोडला महात्मा गांधींचा पुतळा, २ आठवड्यांपूर्वीच पुतळ्याचं झालं होतं नुकसान

न्यूयॉर्क, २० ऑगस्ट २०२२: अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आलीय. येथील एका मंदिरासमोर बसवण्यात आलेली ही महात्मा गांधींची मूर्ती तर फोडलीच, पण त्यावर आक्षेपार्ह शब्दही लिहिले आहेत.

अलीकडं अमेरिकेत गांधी पुतळ्यांवर अनेक हल्ले झाले आहेत. ताजी घटना १६ ऑगस्टची आहे. जिथं पहाटे गांधी पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. हा पुतळा श्री तुळशी मंदिरासमोर ठेवला आहे. पोलिसांचा हवाला देत स्थानिक प्रसारमाध्यमांनी ६ जणांनी या पुतळ्याचं नुकसान केल्याचं वृत्त दिलंय. एवढंच नाही तर मूर्तीवर स्प्रे पेंटने अशोभनीय कमेंटही लिहिण्यात आल्या आहेत.

३ ऑगस्टलाही महात्मा गांधींच्या पुतळ्याची हानी झाल्याची घटना घडल्याचे या अहवालात म्हंटलंय. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ जारी केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या या फुटेजमध्ये मूर्तीवर हल्ला करणारे २५ ते ३० वर्षे वयोगटातील असल्याचं दिसून येत आहे. पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज बेंझमध्ये संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. यासोबत आणखी एक गडद रंगाची कार होती, जी टोयोटा कॅमरी कार असल्याचा संशय आहे.

दरम्यान, न्यूयॉर्क राज्य विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार यांनी या घटनेचा निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा