सिंधुदुर्ग, २ सप्टेंबर २०२२ : बंडखोरी करताना प्रत्येक आमदाराला आमिष दाखवण्यात आले होते. सोबत असलेल्या चाळीसच्या चाळीस आमदारांना प्रत्येकाला मंत्रीपद देण्याचे गाजर दाखवले होते. मंत्रिमंडळाची संख्या पाहता हे शक्य नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात होणारा मंत्रिमंडळ विस्तार अशक्य आहे. आणि जर हा विस्तार झालास तर कलह होऊन हे चाळीस आमदार एकमेकांच्या उरावर बसतील असा दावा शिवसेना नेते खासदार विनायक राऊत त्यांनी केला आहे.
यावेळी बोलताना राऊतांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या, भूमिकेचा चांगला समाचार घेतला. पावसामुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. कृषिमंत्री मेळघाटात पाहणी दौऱ्यासाठी गेले, तरीही त्याचा काही एक फायदा नाही. या भागात अद्याप शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. अशावेळी ते काय साध्य करणार आहेत. या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप करत विनायक राऊतांनी सरकार वर निशाणा साधला.
या वेळी यंदाच्या दसरा मेळाव्यावरून बोलताना त्यांनी शिंदे गटातील दिपक केसरकर यांच्यावरही पलटवार केला आहे. त्याच बरोबर मंत्री उदय सामंत यांनाही चोख उत्तर दिले आहे.दसरा मेळाव्याबाबत बोलताना ते म्हणाले दीपक केसरकरांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चिंता करू नये. भाजपची लाचारी पत्करून मिळवलेले मंत्रीपद पहिले सांभाळावे. दसरा मेळावा घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. आणि त्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळेल. दीपक केसरकर यांची खिल्ली उडवताना राऊत म्हणाले ते सकाळी बोलतात ते त्यांना संध्याकाळी आठवत नाही.
पुण्यामध्ये हल्ला झालेल्या ठिकाणी सभा घेण्याचे आव्हान सामंत यांनी दिले होते.याचा समाचार घेताना राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे यांची पुण्यामध्ये ज्या ठिकाणी सभा झाली, त्या ठिकाणी सभा घेण्याची खुमखुमी उदय सामंत यांना आली होती. त्यातून हा सर्व प्रकार घडला. त्यांनी आम्हाला आव्हान देण्याची उगाच नौटंकी करू नये. आम्हाला आव्हान दिल्यास काय परिणाम होतील, हे तुम्हाला चांगलेच माहित आहे. असा इशारा उदय सामंत यांना दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर