नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२२: (AIFF) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे यांची आज निवड झाली. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बाईचुंग भुतिया हे देखील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत होते. पण चौबे यांनी या पदावर बाजी मारत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा मान मिळवला आहे. या निवडणुकीसाठी एकूण ३४ राज्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी भुतिया यांना केवळ एका राज्याचे मत मिळाले तर चौबे यांना पूर्ण ३३ राज्यांची मतं भेटली आहेत. या विजयामुळे चौबे (AIFF) एआयएफएफचे पहिले असे अध्यक्ष झाले आहेत की ते माजी खेळाडू आहेत. एआयएफएफची कमान माजी फुटबॉलपटूच्या हाती येण्याची ही पहिलीच वेळ असून यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.
एआयएफएफची कमान घेणारे कल्याण चौबे कोण आहेत ?
४५ वर्षीय कल्याण चौबे यांनी फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता. ते पश्चिम बंगालमधील भाजपा चे नेते आहेत. गुजरात आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमधून त्यांना मोठा पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते या पदासाठी आधीच विजयाचे दावेदार मानले जात होते.
२०१९ मध्ये चौबे यांनी कृष्णानगरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. कल्याण चौबे १९९७-९८ आणि २००१-०२ मध्ये भारतीय गोलकीपर ऑफ द इयर म्हणून निवड झाली होती. चौबे हे कोलकाता जायंट्स मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या दोन्ही संघांसाठी खेळले होते. या शिवाय त्यांनी गोव्याच्या साळगावकर संघाचे ही नेतृत्व केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे