घरभाडे न दीलाच्या रागातून भाडेकरूला घर मालकाची मारहाण, अंबरनाथ येथील घटना

अंबरनाथ, दिनांक ९ सप्टेंबर २०२२ : भाडे करूने घरमालकाला घराचे भाडे न दिल्याच्या रागातून, घरमालकासह त्याच्या साथीदारांनी मिळून भाडेकरूला मारहाण केल्याची घटना अंबरनाथ येथे समोर आली आहे. तीन ते चार जण मिळून मारहाण करत असल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. उस्मान अकबरअली अन्सारी असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंबरनाथ पश्चिम येथे ही घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानुसार, उस्मान हा एका ठिकाणी आल्यावर दोघेजण त्याच्यावर हल्ला करताना दिसून आले. सुरुवातीला त्याच्या अंगावर पाण्याचा ड्रमही फेकून मारून त्यानंतर लाकडी दंडुक्याने त्याला मारहाण करण्यात आली. आपल्यावर हल्ला झाल्याचे लक्षात येताच उस्माननेही प्रतिकार केला. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांवर दगडफेक झाली. यातून उस्मानने तेथून पळ काढला. रस्त्यावर चाललेल्या हाणामारीमुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता.या हल्ल्यादरम्यान दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उस्मान याला जमिनीवर पाडून त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे.

उस्मान अकबरअली अन्सारी हा तरुण अंबरनाथ पश्चिमेला उलन चाळ परिसरात अब्दुल रहमान याच्या घरात भाडेकरू आहे. घरमालक अब्दुल रहमान हा भाडेकरू उस्मान याच्याकडे घरभाडे घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी उस्मान याने त्याला घरभाडे दिले नाही.या रागातून अब्दुल रहमान याने एहसान अन्सारी, इरफान अन्सारी आणि फिरोज या साथीदारांना सोबत घेऊन, भाडेकरू उस्मान अकबरअली अन्सारी याला मारहाण केली. यावेळी हातात जे मिळेल ते घेऊन त्याला मारहाण केली. एवढयावर ते थांबले नाही तर त्याच्या दुचाकीचीही मोडतोड करण्यात आली.

ही थरारक घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात एहसान अन्सारी, इरफान अन्सारी, फिरोज आणि अब्दुल रहमान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु यातीला कोणालाही अद्याप अटक केलेली नाही. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. पोलीसांकडून या संपूर्ण घटनेचा आता तपास केला जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा