नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२२ : लम्पी रोगाबाबतीत अधिकृत आकडेवारीनुसार देशभरातील, १५ राज्यांमधील १७५ जिल्ह्यांत त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक गायी तसेच जनावरांना याची लागण झाली असून आतापर्यंत ७५ हजार गायी दगावल्या आहेत. प्रत्यक्षात याचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र देशात ५७ हजार गायी मृत्युमुखी पडल्याचे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले.
लम्पीचा कहर कोरोनाएवढाच भीषण आहे. दुर्दैवाने जनावरे आपली व्यथा सांगू शकत नाहीत. सन २०१९ पासून हा आजार होतोय, परंतु दोन वर्षांत त्याची संख्या कमी होती. या वर्षी मे-जूननंतर कोरोनाप्रमाणे त्याचे साथीच्या आजारात रूपांतर झाले. केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलावी आणि त्याला महामारी जाहीर करून राष्ट्रीय आपत्कालीन प्राधिकरणाने त्याचे बचाव कार्य हाती घेतले पाहिजे. ज्या शेतकरी, पशुपालकांची जनावरे दगावली आहेत त्यांना भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी पशुतज्ञ करत आहेत. दरम्यान, राज्यात लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या जनावरांसाठी शेतकरी, पशुपालकांना जिल्हा परिषदेच्या निधीतून १० हजार रुपये मदत देण्याचे आदेश महसूल, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी जळगाव येथील बैठकीत दिले आहेत.
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्यांमध्ये देशी गायी अधिक आहेत, ही चिंतेची बाब आहे कारण राठी, थारपारकर, कांकरेज, गीर आणि साहिवाल जातींमध्ये संसर्ग जास्त असून या पाच जातींच्या गायी अधिक दूध देतात. लम्पी विषाणूमुळे जनावरांना चर्मरोग होतो. त्याची झपाट्याने लागण होते. डास, माशा आणि चिलटांद्वारे याचा फैलाव होतो. हा रोग जुलै २०१९ मध्ये प्रथम बांगलादेशात आढळला. त्याचवर्षी भारतातील पूर्वेकडील राज्ये, पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये आणि यावर्षी अंदमान-निकोबारसह पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव झालेला दिसतोय.
महाराष्ट्रातील स्थिती ही भयानक आहे. राज्यात १४३५ बाधित जनावरे, ५२ जनावरे दगावली, १७ जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव. त्या जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद. ५ लाख १७ हजार जनावरांना लस देण्याचे उद्दिष्ट. २.८० लाख जनावरांचे लसीकरण झाले. आंतरजिल्हा, आंतर तालुका, आंतरराज्य जनावरे वाहतुकीला बंदी.
गो पालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे दुधाचीही टंचाई जाणवत आहे. ज्या राज्यांमध्ये प्रादुर्भावर मोठ्या प्रमाणात आहे तिथे पाऊस कधी थांबतो याकडे राज्य सरकारांचे लक्ष लागून आहे. पावसामुळे या आजाराचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याचे मानले जात आहे. पाऊस थांबताच डास,माश्या कमी होतील आणि लम्पी आटोक्यात येऊ शकेल. दरम्यान,जनावरांचे लसीकरणही वेगात सुरु आहे. सध्या गायींना पॉक्स लस दिली जात आहे. राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र आणि भारतीय पशु चिकित्सा संशोधन संस्था स्वदेशी लस निर्मितीची तयारी करीत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे