भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाने खळबळ, काँग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर

9

नाशिक, १२ सप्टेंबर २०२२ : राज्यात गणपतीच्या आगमनानंतर अनेक नेत्यांनी विविध ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचीही भेट झाल्याच्या चर्चा होती. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांच्यासह नऊ आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. परंतु आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे अजून एक काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर आहेत का यामुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, जर कोणी काँग्रेसच्या विरोधात आपली भूमिका मांडली तर ते भाजपाच्या संपर्कात आहेत असे बोलणे चुकीचे आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी सगळ्यांना भाजपची दारे खुली आहेत. परंतु आम्हाला जिथे गरज आहे त्याच ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश देऊ. हे सांगतानाच काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विषयी बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्वा विषयी केलेल्या विधानामुळे राज्यभर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच आता बावनकुळे यानी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विषयी मोठे वक्तव्य केले आहे.त्यामुळे काँग्रेस मधील कार्यकर्तेही गोंधळात पडले आहेत.

काँग्रेस पक्षात ज्या ज्या ठिकाणी चुका होत आहेत त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत. विधानसभेमध्ये त्यांना चौथ्या रांगेत स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना वाईट वागणूक मिळत आहे. काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, तर ते भाजपच्या संपर्कात आहेत असा अर्थ होत नाही. भाजपची दारे सर्वांसाठी खुली आहेत. परंतु आम्हाला ज्या ठिकाणी गरज वाटते त्याच ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश देऊ असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, पटोले यांना दिवसा दिवास्वप्न पडत आहेत. पटोले यांचीच परिस्थिती काँग्रेसमध्ये केविलवाणी झाली आहे. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काय ऑफर देणार. आणि स्वतः गडकरी साहेबांनी ही मी जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे पटोले यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर