मोहाली, २० सप्टेंबर २०२२: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज (२० सप्टेंबर) मोहालीच्या PCA स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. २०२२ T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतासमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे मधल्या फळीतील संयोजन, ज्याला रोहित ब्रिगेड या मालिकेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करेल.
विश्वचषकापूर्वी होणा-या सहा T20 सामन्यांसाठी काही वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली असेल, परंतु पाहिल्यास, भारत एकंदरीत आपल्या मजबूत संघासोबत जात आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारत दक्षिण आफ्रिकेचेही तीन T20 सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे.
बुमराह-हर्षल पुनरागमन करणार
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेपूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपले खेळाडू करतील, असं कर्णधार रोहित शर्माने आधीच स्पष्ट केलंय. आशिया चषक स्पर्धेत भारताने चांगली फलंदाजी केली असली तरी या काळात अनेक बदलही केले. या स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीतील कमकुवतपणाही समोर आला, पण हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळं आक्रमणाला बळ मिळालंय.
पंत आणि कार्तिकमध्ये कोणाला संधी मिळणार?
रोहित शर्माने स्पष्ट केलं की, विश्वचषकात केएल राहुल त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल, पण आजच्या सामन्यात विराट कोहली त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल अशी शक्यता आहे. शेवटच्या T20 डावात शतक झळकावणाऱ्या कोहलीला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले जाऊ शकते. भारतीय फलंदाजी क्रमवारीतील अव्वल चार फलंदाज निश्चित आहेत, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत की दिनेश कार्तिक यांची निवड केली जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही.
रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे, भारत कार्तिकपेक्षा ऋषभ पंतला प्राधान्य देऊ शकतो, कारण तो डावखुरा फलंदाज आहे. फिनिशरच्या भूमिकेसाठी कार्तिकची निवड करण्यात आलीय. त्याला आशिया चषक स्पर्धेत फलंदाजीची संधी मिळाली नाही, परंतु संघ व्यवस्थापन त्याला पुढील दोन आठवड्यात क्रीजवर थोडा वेळ घालवण्याची संधी देऊ शकते. दीपक हुड्डा आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरच्या सर्व सामन्यांमध्ये खेळला, पण संघातील त्याच्या भूमिकेबाबत स्पष्टता नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे