नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२२: भारतीय हवाई दल आपली MiG-21 स्क्वॉड्रन स्वॉर्ड आर्म्स निवृत्त करण्याच्या तयारीत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये बालाकोट हल्ल्याच्या एका दिवसानंतर, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं तेव्हा ते MiG-21 उडवत होते.
पीटीआयच्या वृत्तानुसार, स्वॉर्ड आर्म्स MiG-21 हवाई दलाच्या उर्वरित चार स्क्वॉड्रनपैकी एक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेनुसार श्रीनगरमध्ये तैनात असलेलं हे स्क्वाड्रन सप्टेंबरच्या अखेरीस निवृत्त होणार आहे. MiG-21 चे उर्वरित तीन स्क्वॉड्रन २०२५ पर्यंत सैन्यातून काढून टाकले जातील.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या जवळपास दोन आठवड्यांनंतर २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर बॉम्बफेक केली. याला प्रत्युत्तर म्हणून २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय हवाई दलाने तो हाकलून लावला.
त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (आता ग्रुप कॅप्टन) MiG-21 उडवत होते. त्याच विमानातून त्यांनी पाकिस्तानचे F-16 पाडलं. मात्र, नंतर अभिनंदन यांचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं, त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं. भारताच्या दबावाखाली पाकिस्तानने सुमारे ६० तासांनंतर अभिनंदन यांना सोडलं होतं. या अदम्य साहसाबद्दल त्यांना २०१९ च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वीर चक्र प्रदान करण्यात आलं.
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सुमारे चार दशकांपूर्वी MiG-21 जेट विमानाचा समावेश करण्यात आला होता. यातील अनेक विमानेही कोसळली आहेत.
सोव्हिएत काळातील ही लढाऊ विमाने अनेक वर्षांपासून अपघातांमुळं चर्चेत आहेत, या अपघातांमध्ये अनेक वैमानिकांचा मृत्यूही झालाय.
श्रीनगरमध्ये स्थित ५१ स्क्वॉड्रनला स्वॉर्ड आर्म्स म्हणूनही ओळखलं जातं. या ताफ्याने १९९९ मध्ये कारगिल युद्धातही भाग घेतला होता. भारत रक्षक वेबसाइटनुसार, या स्क्वाड्रनला वायुसेना पदकही मिळालं आहे. ऑपरेशन पराक्रम दरम्यान, या स्क्वाड्रनकडे काश्मीर खोऱ्याच्या हवाई संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे