अति दुर्गम भागातील अल्पवयीन बालकांची अवघ्या पाचशे रुपयांमध्ये विक्री, पालघर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जव्हार, २१ सप्टेंबर २०२२ : आपल्या मुलांना भौतिक सुख सुविधा देऊन त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी पालक वर्ग आपल्या पोटाची खळगी भरत असताना प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत जगतात. परंतु कुटुंबाची असलेली आर्थिक परिस्थिती आणि अगतिकता याचा फायदा घेत पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची अवघ्या पाचशे रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मनीषा नरेश भोये आणि काळू नरेश भोये अशी या अल्पवयीन मुलींची नावे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपालकाकडे मनीषा मागील 3 वर्षांपासून तर काळू एक वर्षापासून बालमजुरीचे काम करत होते. मागील काही वर्षांपासून या दोन्ही चिमुकल्याना या मेंढपाळाकडे मेंढ्यांची देखभाल आणि मेंढ्यांना रणोमाळ चारण्यासाठी घेऊन जाणे अशा कामांसाठी त्यांना राबवण्यात येत होते. त्यांना या बदल्यात वर्षाचे बारा हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचे मेंढपाळाकडून कबूल करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात वर्षाला अवघे पाचशे रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानंतर या प्रकरणात श्रमजीवी संघटनेकडून पुढाकार घेण्यात आला.अखेर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळा विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आठ वर्षीय मनीषाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तर सहा वर्षीय काळु भोये हिचा जव्हार पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणात तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान जव्हार, मोखाडा, विक्रमगड या परिसरातील अतिदुर्गम असलेल्या भागातील नागरिकांच्या अडाणीपणा आणि उदरनिर्वाहाच्या साधनसामग्रीच्या अभावाचा फायदा घेऊन येथील चिमुकल्या मुलांची खरेदी करण्यात येते. आणि त्यांना वेठबिगारी म्हणून राबवले जात असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा