कोरोनरी दुर्मिळ शस्त्रक्रियेमुळे वाचले रुग्णाचे प्राण…

13

पुणे, २३ सप्टेंबर २०२२: दुर्मिळ मल्टिपल व्हेन्ट्रीक्युलर टॅकीकार्डियाचा सामना करणाऱ्या रुग्णावर बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल्समध्ये कोरोनरी ही अनोखी शस्त्रक्रिया पार पडली. छातीतील धडधड अनैसर्गिक पद्धतीने वाढल्याची तक्रार केल्याने या रुग्णाला आधी स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डियाचा झटका आल्याचे ईसीजीमध्ये दिसून आले व त्यांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी अधिक उच्च क्षमतेच्या कार्डिअॅक देखभालीसाठी बाणेरच्या मणिपाल हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आले.

इकोकार्डिओग्राफी केल्यानंतर त्यांच्या हृदयाच्या पंपिंगची क्षमता सुमारे ३०-३५ टक्के इतक्या गंभीर प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले. त्यातच रक्ताच्या एका मोठ्या गुठळीमुळे एका धमनीमध्ये १०० टक्‍के ब्लॉकेज असल्याचेही अँजिओग्राफीमध्ये दिसून आले. उच्च क्षमतेची औषधे बंद केल्याने रुग्णाची प्रकृती वेगाने ढासळत होती व त्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली होती. त्यांना कार्डिओव्हर्जनसाठी इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला. हृदयाचे ठोके नियमित केल्यानंतर डॉ. अभिजीत जोशी आणि डॉ. धनंजय झुत्शी यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलच्या विषयाला समर्पित कार्डिओलॉजी टीमने कोरोनरी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पाडली. ज्यामुळे रुग्णाला असलेला कार्डिअॅक अरेस्टचा धोका टळून त्यांचे प्राण वाचले.

या विषयी बोलताना कार्डिओलॉजी विभागाचे कन्सल्टन्ट डॉ. अभिजीत जोशी म्हणाले, “रुग्णाच्या एका धमनीवर २०१३ साली अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर त्यांनी आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारली होती. तरीही त्यांना दुसरा हार्ट अटॅक आला. त्यानंतरच्या अँजीओप्लास्टीनंतर रक्तदाब नियमित ठेवण्यासाठी त्यांना इंट्रा-एओर्टिक बलूनच्या आधारे ठेवण्यात आले होते. तसेच यांत्रिक व्हेंटिलेशन आणि श्वासोच्छवासाला कृत्रिम यंत्रणेची मदत पुरविण्यात आली होती. रुग्णाच्या तीव्र इच्छाशक्तीच्या मदतीने, क्रिटिकल केअर टीम आणि कार्डिओलॉजी टीमने हळूहळू औषधे, व्हेंटिलेटर आणि इंट्रा-आओर्टिंक बलून पंपसह सर्व जीवनरक्षक आधार काढण्यात आले व रुग्णाकडून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाला. “अशा गंभीर प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी कार्डिओलॉजिस्ट्स, अॅनेस्थेटिस्ट्स, क्रिटिकल केअर टीम इंटेन्सिव्हिस्ट्स, कॅथ लॅबचे तांत्रिक आणि पॅरा-मेडिकल कर्मचारी यांच्या टीममधील उत्तम समन्वय तसेच उच्च दर्जाचे कॅथ लॅब तंत्रज्ञान आवश्यक असते. हे सर्व घटक एकत्र आले आणि रुग्णाचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले.

बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये आम्ही कोणत्याही आपत्कालीन स्थितीला हाताळण्यासाठी सज्ज असतो आणि येथे प्रत्येक स्पेशलिटी आणि सुपरस्पेशलिटीचे पूर्णवेळ हॉस्पिटलमध्ये उपलब्ध संपूर्णपणे समर्पित कन्सल्टन्ट्स रुग्णांना सर्वोत्तम उपचार देऊ करतात, असे हॉस्पिटलचे संचालक डॉ. विजू राजन म्हणाल्या. सध्याच्या काळात हृदयविकाराचे प्रमाण वाढले असल्याने स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे. हे मात्र खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस