नागपूर, २४ सप्टेंबर २०२२ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्याच्या टी ट्वेन्टी मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे काल खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ६ विकेट्स ने दणदणीत विजय मिळवला.या विजयासह टीम इंडियाने ३ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
या सामन्याचा टॉस ६:३० वाजता होणार होता. पण पावसामुळे मैदान ओले होते म्हणून पंचांनी थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला.निर्धारित वेळेपेक्षा तब्बल अडीच तासानंतर या सामन्याला ९:३० ला सुरुवात झाली.या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. आठ षटकाच्या या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८ षटकात ९१ धावा केल्या. प्रतिउत्तरात भारताने ४ चेंडू राखून व ६ विकेट्स राखून सामना जिंकला.
अडीच तासाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. पण भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. भारताच्या फिरकीपटू अक्षर पटेल ने भारताच्या दुसऱ्या षटकात कमालच केली. अक्षरच्या या षटकात कॅमेरून ग्रीन हा ५ धावावर धावचित झाला. त्याच षटकात अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेलने धोकादायक मॅक्सवेलला पहिल्या चेंडूवर त्रिफळा चित केले. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या टीम डेविडला ही त्यांनी चौथ्या षटकात अवघ्या दोन धावावर आऊट करून घरचा रस्ता दाखवला. त्यांनतर ऑस्ट्रेलियाचे विकेट्स एकामागून एक पडत असताना, फिंच मैदानात उभा होता आणि तो दमदार फटकेबाजी करत होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेड ने २० चेंडूत नाबाद ४३ धावा केल्याने ऑस्ट्रेलियाने धावसंख्या ९० पर्यंत नेली.
प्रतिउत्तरात, भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व केए ल राहुल यांनी सलामी दिली. जोश हेजळवूडच्या पहिल्या षट कात २० धावा वसूल करत त्यांनी दमदार सुरुवात केली. त्यानंतर भारताच्या विकेट्स पडल्या पण कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासून टिकून राहत दमदार फटकेबाजी सुरुच ठेवली. त्यांनी २० चेंडूत चार षटकार आणि चार चौकार मारत नाबाद ४६ धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत भारताचा विजय जवळपास नक्की केला. पुढच्या चेंडूवर चौकार ठोकत त्यानें संघाला विजय मिळवून दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव