पुणे, २८ सप्टेंबर २०२२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. यासाठी विद्यापीठाला मान्यता मिळाली असून, १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. देशाच्या संरक्षणासाठी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी असतात. त्यामुळे एनसीसी तुकडीची मान्यता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.
विद्यापीठाला स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर संबंधित तुकडीला मान्यता देण्यात आलेली आहे. पुढील तीन वर्षे प्रत्येकी ३५ विद्यार्थ्यांना एनसीसीला प्रवेश घेता येणार आहे. यामध्ये ३३ टक्के मुलींना देखील प्रवेशाची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र एनसीसीचे संचालनालयांतर्गत सहा गट आहेत. त्यातील पुण्यात एक मुख्यालय आहे. या मुख्यालयातील एका युनिटअंतर्गत विद्यापीठातील तुकडीलामान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यापीठाला कोणताही निधी मिळणार नसून एनसीसी तुकडीचा सर्व खर्च विद्यापीठालाच करावा लागणार आहे. विद्यापीठात जवळपास ६०० विद्यार्थी पदवीच्या विविध अभ्यासक्रमांना दरवर्षी प्रवेश घेतात. संबंधित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी असोसिएट एनसीसी ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना बी आणि सी सर्टिफिकेट मिळतील. त्याचबरोबर नॅशनल कॅम्पसाठीसुध्दा निवड होणार आहे.
विद्यार्थ्यांना १२ व्यातरिक्त विषयांचे मिळणार प्रशिक्षण …
एनसीसीमध्ये एनसीसी म्हणजे काय, शस्त्र प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, आपत्ती व्यवस्थापन, जीवनावश्यक कौशल्ये, वेळेचे व्यवस्थापन, नेतृत्वगुण विकास, सामाजिक जागरूकता आणिसामुदायिक विकास, पर्यावरणीय जागरूकता, साहसी कृत्ये आदी १२ विषयांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना तीन वर्षांत देण्यात येणार आहे.
एनसीसीचे प्रशिक्षण आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जाण्यासाठी उपयोगी पडतेच. शिवाय, दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात एनसीसी प्रशिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी चमकतोच; कारण एनसीसी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झालेला असतो. त्यांना स्वयंशिस्त असल्यामुळे जीवनात त्याचे फायदे होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून विद्यापीठात पहिल्यांदाच अशा प्रकारचे युनिट सुरु होणार आहे. यातून पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड