“२०२४ मध्ये महाविकास आघाडीला उमेदवारदेखील मिळणार नाही” चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

अमरावती, ३० सप्टेंबर २०२२ : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत दौऱ्यावर आहेत, “आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १८ – १८ तास सलग काम करतात. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातदेखील येत नव्हते. त्यामुळे या काळात काहीही काम झाले नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीत विरोधकांना मोठे धक्के बसतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

अमरावतीत मागील वर्षी भाजपने रॅली काढली होती. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात आज जिल्हा व सत्र न्यायालयात बावनकुळे यांनी हजेरी लावली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यावर असताना महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातील कारभारावर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात विकास रखडल्याने जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. गावाखेड्यातील कार्यकर्ते महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील विकासकामांची तुलना करत आहेत. यामुळे २०२४ मधील निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवारदेखील मिळणार नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

बारामती वरूनच राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडू:

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना आजही शरद पवारांचा आधार घ्यावा लागतो, त्या शरद पवार यांच्या नावावर कितीदा निवडून येतील आता फक्त मोदींच्या नावावरच लोक निवडून येणार व मोदींच्या नावावरच सरकार येतील, तर आता बारामती मधूनच राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडू” असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

“फक्त बारामती शहराचा विकास झाला आहे, बारामती मतदारसंघात पाच मतदारसंघ येतात ते मतदारसंघ विकासापासून आजही वंचित आहे, तर पवार कुटुंबाच्या पायाखालची वाळू घसरली आहे आता तर हे शतक एकविसावं शतक आहे, त्यामुळे आगामी काळात बारामतीला झटका बसेल” असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा