नवी दिल्ली : ई-सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर ई-सिगारेटचे उत्पादन, आयात व विक्री गुन्हा ठरणार आहे.
त्यामुळे आता ई-सिगारेटच्या उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्रीला मज्जाव करणारे नवीन विधेयक या अध्यादेशाची जागा घेईल. सर्वच पक्षाच्या बहुसंख्य खासदारांचा या विधेयकाला पाठिंबा होता. फक्त ई-सिगारेटवर बंदी घालून थांबू नका तर तंबाखूजन्य सिगारेटही शरीराला हानीकारक आहे. त्यामुळे ई-सिगारेटप्रमाणे त्यावरही बंदी घालावी, अशी बहुसंख्य खासदारांची मागणी आहे.
‘सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ई-सिगारेटचा वापर करा,’ असा अपप्रचार अनेकदा होतो. मात्र ई-सिगारेटही आरोग्यासाठी हानिकारकच आहे.
ई-सिगारेट म्हणजे, तिचा सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. ई-सिगारेट साध्या सिगारेटसारखीच दिसते. फरक इतकाच की, ई-सिगारेटमध्ये तंबाखू नसून द्रवरूपातले निकोटिन असते.
ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, सिगारेटमध्येच एक लहान बॅटरी असते. जेव्हा सिगारेट ओढायची असते, तेंव्हा द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते.