मुंबई, २ ऑक्टोंबर २०२२ : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघातील शेकडो शिवसैनिकांनी आज शिंदे गटात प्रवेश केल्याने हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दसरा मेळाव्याच्या काही दिवसांआधीच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळीतील कार्यकर्त्यांनी साथ सोडली आहे. आदित्य ठाकरेंना मिळणाऱ्या धक्क्यांची ही सुरुवात आहे. यानंतर त्यांना आणखी मोठमोठे धक्के बसतील असा इशारा शिंदे गटातील नेते किरण पावसकर यांनी दिला आहे. वरळीत अनेक समस्या आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते, तरीही हे प्रश्न सुटू शकले नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप होता, असे पावसकर म्हणाले आहेत. हिंदूत्वाची वज्रमुठ उशिरा का असेना आदित्य ठाकरेंना आठवली, असा टोलाही त्यांनी वृत्त वाहिनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. ४० आमदार, १२ खासदार यांसह अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला रामराम केला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या उठवानंतर शिवसेनेत सुरू झालेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे आहे.
मिलिंद नार्वेकरही शिंदे गटाच्या वाटेवर?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहायक आणि त्यांच्या अत्यंत विश्वासातील मिलिंद नार्वेकर शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. दसरा मेळाव्याला शिवसेनेतील काही आमदार आणि नेते शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत. शिवसेनेत फूट पाडल्यानंतरही गणेशोत्सवात एकनाथ शिंदे गणपती दर्शनासाठी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गेले होते. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार याबाबत चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसेनेला बळकट करण्यासाठी काय प्रयत्न करतील याकडे आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे. त्यातच दसरा मेळावा तोंडावर असताना हा पक्षप्रवेश झालेला असल्याने ही बाब शिवसेनेसाठी चिंता वाढवणारी मानली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे