खेडा, ४ ऑक्टोबर २०२२: गुजरातमधील खेडा येथील उंधेला गावात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीत सहाजण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील प्रमुखांकडून या गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रम स्थळापासून जवळच मंदिर आणि मशीद आहे. त्यामुळे कार्यक्रम सुरु होण्याआधी काही लोकांनी येऊन येथे कार्यक्रम बंद करण्यास सांगितले. यानंतर केलेल्या दगडफेकीत सहाजण जखमी झाले आहेत.
गावात पोलीस तैनात
दगडफेक झाल्याची माहिती मिळताच डीएसपी राजेश गाधिया आणि क्राइम ब्रांचचं पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गावामध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस सध्या आरोपींची ओळख पटवत असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डीएसपी राजेश गाधिया यांनी सांगितले की, उंधेला गावात नवरात्री साजरी होत असताना आरिफ आणि जाहीर गटातील काहीजणांनी गोंधळ घातला. यानंतर त्यांनी दगडफेक केली, यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.