संजय राऊतांच्या कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई, ४ ऑक्टोंबर २०२२: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी मध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येत आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जामीन अर्जावरही १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे राऊत यांचा दसरा मेळावा कोठडीमध्येच होणार आहे.

दरम्यान, संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून, यावरील सुनावणी विशेष पीएमएलए न्यायालयात सुरू आहे.

नेमके काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण ?

ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांना देण्यात आले होते. मात्र, प्रविण राऊत यांच्या कंपनीने म्हाडा भाडेकरूंसाठी घरे न बांधताच ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे उघड झाले. तर त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचे समोर आले आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा