एलईडी टीव्हीचा स्फोट होऊन तरुणाचा मृत्यू, तीन जण जखमी

गाझियाबाद, ५ ऑक्टोंबर २०२२: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घरातील एलईडी टीव्हीचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका १६ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर त्याची आई, वहिनी आणि मित्र जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ओमेंद्र असे मृत मुलाचे नाव आहे. गाझियाबादच्या हर्ष विहारमध्ये राहणारा १६ वर्षीय ओमेंद्र घरात आपला मित्र करणसोबत टीव्ही पाहत होता. त्याच्या घरात एलईडी टीव्ही होता. दोघं जण टीव्ही पाहत असताना थोड्या वेळाने ओमेंद्रची आई ओमवतीही तिथे आली आणि तिघं एकत्र बसून टीव्ही पाहू लागले आणि
अचानक एलईडी टीव्हीमध्ये ब्लास्ट झाला.

बॉम्ब फुटावा तसा हा टीव्ही फुटला आणि त्याचा आवाज इतका मोठा होता की शेजारील लोकही घाबरून घरातून बाहेर धावत आले. संपूर्ण घर धुराने भरले होते. तर घराची भिंतही तुटली होती. दरम्यान, शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान ओमेंद्रचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. तर त्याचा मित्र आणि आईवर उपचार सुरू आहेत.

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शहराचे एसपी ज्ञानेंग्र कुमार सिंह यांनी सांगितले की, या दुर्घटनेच्या कारणांचा तपास केला जात असून हाय व्होल्टेजमुळे एलईडी टीव्ही फुटला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा