मुंबई, ७ ऑक्टोबर २०२२ : मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये ड्रग्ज विरोधी मोठी कारवाई चालू आहे. मागील आठवड्यात नवी मुंबईमध्ये वाशी येथे पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणारा एक ट्रक पकडला होता. यावेळी जवळपास १४०० कोटींपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई विमानतळावर एका परदेशी प्रवाशाकडे तब्बल १०० कोटींचे ड्रग्ज मिळाले होते. या घटना ताज्या असतानाच गुरुवारी आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्ज तस्करीच्या विरोधात मोठी कारवाई केली. या अधिकाऱ्यांनी सुमारे १०० कोटी रुपयांचे ड्रग्ज मुंबई विमानतळावरून जप्त केले.
एका परदेशी प्रवाशाकडून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी पाळत ठेवून ट्रॅकिंग टीम तैनात करण्यात आली. या वेळी मुंबई विमानतळावर एक संशयित प्रवासी आढळून आला. या प्रवाशाने सुरुवातीला वेगवेगळी कारणे सांगितली. परंतु अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेऊन कसून चौकशी केली. या वेळी त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये बनवलेल्या कप्प्यांमध्ये लपवून ठेवलेले सोळा किलो हेरॉईन अधिकाऱ्यांना मिळाले. या प्रवाशाकडे सुमारे १०० कोटींहुन जास्त किमतीचे हेरॉईन मिळाले आहे. अधिकाऱ्यांनी ड्रग्ज जप्त करून संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर