झाशीतील बाबिना कॅंट फील्ड फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना; दोन भारतीय जवान शहीद

नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर २०२२: झाशीतील बाबिना कँट फील्ड फायरिंग रेंजमध्ये मोठी दुर्घटना झाली आहे. नियमीत युद्धाभ्यास सुरू असताना गोळीबारामुळे दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान गंभीर जखमी झालेला आहे. त्या जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गुरूवारी रात्री झाली. नियमित सरावाच्या दरम्यान लष्कराच्या T-90 तोफांच्या बॅरलचा अचानक स्फोट झाला. यात दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले. नायब सुभेदार सुमेर सिंग आणि सुभेदार सुकांता मंडल अशी त्यांची नावे आहेत सुभेदार सुमेर सिंग हे राजस्थानच्या बगरिया येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच टँक चालक प्रदीपसिंग यादव (रा.संत कबीर नगर रहिवासी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बाबिना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रदीप यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच हा अपघात कसा घडला, सरावाच्या वेळी सैनिकांसाठी सुरक्षा व्यवस्था होती का, याचाही क्रमवार तपास सुरू आहे. दरम्यान, शहीद जवानांच्या पार्थिवावर कुटुंबीयांच्या उपस्थितीत पूर्ण आदराने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासोबतच लष्कराकडून कुटुंबीयांना मदतीसह इतर प्रकारच्या सुविधाही दिल्या जाणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा