मुंबई, ९ ऑक्टोंबर २०२२ : शिवसेनेचं धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह निवडणूक आयोगानं तात्पुरत्या स्वरूपात गोठवलं आहे. त्याबरोबर शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटाला वापरता येणार नाही. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मनाई केली आहे. या प्रकरणावर आता खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले, सरकारच्या स्वायत्त संस्था ईडी, सीबीआयनंतर निवडणूक आयोगही बेठबिगार झाला आहे. कोणी तरी तक्रार केली, याची छानणी न करता निवडणूक आयोगाने चार तासात आदेश दिला आहे. कोणाच्या आदेशानुसार हे सर्व सुरु आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे. न्यायालयाच्या निर्णयापूर्वी गृहमंत्री हीच खरी शिवसेना असल्याचं सांगतात, असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी अमित शाहांवर केला आहे
हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष पुढं चालवला आहे, तसेच देशातील ज्या जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे ती जनता शिवसेनेच्या पाठिशी उभी राहिल, शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. शिवसेना हे आमच्या बापाचं नाव आहे, ते कुणीही आलं तरी काढून घेऊ शकणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेनं उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुख मानलंय. निवडणूक आयोगाकडून जे चिन्ह दिलं जाईल ते राज्याची जनता स्वीकारेल, असं अरविंद सावंत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक धनुष्यबाण या चिन्हाविनाच लढवावी लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटाला वापरता येणार नाही. तर यावरून आता एकमेकांनवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे